चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे उद्घाटन  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करुन अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल. चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. सर्वांना बरोबर घेवून जाण्याचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण आत्मसात केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दादर येथील चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी .आठवले बोलत होते.
				  													
						
																							
									  
	 
	आठवले म्हणाले, चैत्यभूमीचे सुशोभिकरण लवकरच केले जाईल. भव्य दिव्य असा स्तूप उभारला जाईल, इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकही लवकरच पूर्ण करण्यात येईल.
				  				  
	डॉ.खाडे म्हणाले, चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारुन लाखो भीम अनुयायांचे स्वप्नपूर्ण झाले आहे. बाबासाहेबांचे विचार सर्वांना समजले पाहिजे त्यासाठी ही भीमज्योत प्रेरणा देणारी आहे. राज्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पुतळ्यासमोर भीमज्योत उभारण्यासाठी शासन प्रयत्न करेल.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर म्हणाले, चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मरणोत्तर उचित सन्मान राखला जात आहे. आपल्याबरोबर देशातील सर्व घटक यात सहभागी होत आहेत. ही आनंदाची बाब आहे. चैत्यभूमीचे सुशोभिकरण करण्याचे शासन स्तरावर प्रयत्न केले जातील.