रत्नागिरी मार्ग बंद, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यात गेली 4 दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या ओसांडून वाहत आहेत. राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले असून पंचगंगा नदीच्या पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम बंधाराऱ्याची पाणी पातळी आज सकाळी 10 वाजता 40 फूट 02 इंच इतकी आहे.तर पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी ४३ फूट इतकी आहे.केर्ली येथे पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद करण्य़ात आला आहे. प्रशासनांकडून नदीकाटावरील गावांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.
आज दिवसभरात पावसाचा जोर कमी राहिला तरीही पाणी वाढत असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. काल दिवसभरात सुमारे 50 वर कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. एकाच महिन्यात सलग दुसऱ्यावेळी ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागत आहे.