गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (08:36 IST)

रिझर्व्ह बँकेचा दणका! या बँकेचा परवाना केला रद्द; व्यवहारही थांबविले

RBI hit! Revoked the license of this bank; Transactions also stopped Maharashtra News Regional News in marathi webdunia marathi
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे.पुरेसा निधी आणि मिळकतीची शक्यता नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले आहे.आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार ठेवीदारांना पूर्ण परतफेड करण्यास बँक असमर्थ ठरू शकते. त्याशिवाय सहकार आयुक्त आणि सहकारी समित्यांच्या निबंधकांनी राज्यातील बँकेच्या सर्व शाखा बंद करण्याची तसेच प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश जारी करण्याची विनंती केली आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को ओपरेटिव्ह बँकेकडे पुरेसा निधी जमविण्याचा तसेच मिळकतीचा कोणताच पर्याय नाही. बँकेची परिस्थिती बँकिंग विनियमन अधिनियम १९४९ च्या तरतुदीशी अनुकूल नाही.
बँक सुरू ठेवणे ठेवीदारांच्या हितासाठी योग्य नाही. बँकेच्या व्यवसायाला पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास जनहितावर परिणाम होईल. परवाना रद्द करताच बँकेत पैसे देण्याघेण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले.