मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (08:32 IST)

गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा महिला काँग्रेसने पंतप्रधानांना पाठविल्या शेणाच्या गौऱ्या ;

अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अभिनवरित्या निदर्शने करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून चक्क शेणाच्या गौऱ्या कुरियर द्वारे दिल्लीला पाठविण्यात आल्या आहेत. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना हिंदीतुन निवेदन पाठविले आहे.
 
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशावरून नगर शहरात शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आंदोलनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रभारी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधाताई नागवडे, प्रदेश महिला महासचिव उत्कर्षाताई रूपवते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात मोहीम राबवली जात आहे.

सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सुमन कालापहाड, शारदा वाघमारे,उषा भगत,माजी नगरसेविका जरीणा पठाण,हेमलता घाटगे,रजनी भोसले,गीता लक्ष्मण,रिजवाना पटेल,कविता लोडगे,मुक्ता डहाळे आदी महिला पदाधिकाऱ्यांसह गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी नरेंद्र मोदींना पाठविण्यात आलेल्या शेणाच्या गौऱ्या हातात धरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
 
पंतप्रधानां पाठविलेल्या हिंदी निवेदनामध्ये महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच गॅस दर प्रचंड वाढले असून गगनाला भिडले आहेत. कोरोना महामारीमुळे आमचे मासिक उत्पन्न घटले आहे. अनेक आप्तेष्टांना, जवळच्यांना आम्ही या महामारीत गमावले आहे.

एका बाजूला हे दुःख आणि आर्थिक संकट असताना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने गॅसच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे आमच्या महिला वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे.परमेश्वर केंद्र सरकारला गॅसची दरवाढ तातडीने कमी करण्याची सद्बुद्धी देवो असे म्हणायला देखील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या विसरलेल्या नाहीत.

मोदी सरकारच्या मर्मावर बोट ठेवत या निवेदनात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेत नसताना थोडी जरी गॅस दरवाढ झाली तर भारतीय जनता पार्टीचे नेते, महिला,कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने,आंदोलन करायचे. आता तर देशात भाजपची सत्ता आहे. तरी सुद्धा भाववाढ होतच आहे.
 
पण त्यावेळी आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते आता कुठे गायब झाले आहेत ? असा सवाल या निवेदनामध्ये महिला काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित केला आहे.पंधरा लाख रुपयांच्या वाद्याची करून दिली आठवण निवेदनाच्या शेवटी महत्त्वपूर्ण विनंती असे म्हणत पंतप्रधानांना २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या पंधरा लाख रुपयांच्या वाद्याची आठवण करून द्यायला महिला पदाधिकारी विसरलेल्या नाहीत.

मोदी सरकार सत्तेत येऊन जवळपास सात वर्षे उलटली तरी देखील आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आपण वचन दिल्याप्रमाणे अद्यापही जमा झालेले नाहीत.तेवढे तात्काळ पाठवून द्यावेत,असे नमूद करत मोदी सरकारला त्यांनी केलेल्या चुनावी जूमल्याची आठवण महिला काँग्रेसने करून दिली आहे.
 
उपरोधिक निवेदनाची सोशल मीडियात चर्चा निवेदनामध्ये पंतप्रधानांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत असल्याचे काँग्रेस महिला पदाधिकार्‍यांनी म्हटले असून पत्राच्या शेवटी आपले नम्र म्हणून गॅस दरवाढीमुळे देशातील समस्त त्रस्त महिला असे संबोधित केले आहे. शहर महिला काँग्रेसचे हे निवेदन सोशल मीडियामध्ये चांगलेच व्हायरल झाले असून महिला कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या थेट पंतप्रधानांना पाठविलेल्या शेणाच्या गौऱ्यासह या आगळ्यावेगळ्या निवेदनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.