सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (10:26 IST)

वाचा, उद्धव ठाकरे 22 जानेवारीला काय करणार

uddhav thackeray
उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. या सगळ्या दरम्यान महाराष्ट्राचे माजी मंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला ते काय करणार आहेत हे स्पष्ट केले. मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंसह कुटुंब दादर शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. जेव्हा वाटेल तेव्हा अयोध्येला येईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
ठाकरे गटातर्फे 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी उद्धव ठाकरे 22 जानेवारीला ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात उपस्थित राहणार असून गोदावरीच्या तीरावर महाआरती देखील करणार आहेत. तर 23 जानेवारीला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचे नाशिकमध्ये शिबीर होणार आहे. तसेच त्याच रात्री अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.
 
"अयोध्या राम मंदिराचा अभिमान आणि स्वाभिमानाचा विषय आहे. बाबरी पाडल्यानंतर 25-30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. आम्ही 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्या दिवशी नाशकात गोदावरीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल.  त्या दिवशी (22 जानेवारी) संध्याकाळी 6.30 वाजता आपण काळाराम मंदिरात जाऊ, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजींनी आंदोलन केले होते. संध्याकाळी 7.30 वाजता आम्ही गोदावरी नदीच्या काठावर महाआरती करू,' असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
"अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमान, अस्मिता आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Edited by -Ratnadeep Ranshoor