मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 20 मार्च 2021 (14:03 IST)

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे खाजगी कार्यालयात 50 टक्के उपस्थितीचे निर्बंध

महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. कोरोना संकट गडद झाल्याची जाणीव आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून या संदर्भातील नियमावली आज जाहीर करण्यात आली.
 
राज्यात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन राज्य सरकारने कोरोनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
 
मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्‍चित करावे, असेही या आदेशात म्हटले आहे. नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थिती देखील 50 टक्के करण्यात आली आहे. नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चेहर्‍यावर मास्क व्यवस्थित लावलेला नसेल, तर प्रवेश देण्यात येऊ नये. लोकांकडून कोरोना नियमाचं पालन करवून घेण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ असेल, याची खातरजमा करून घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.