गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By BBC|
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (13:17 IST)

ऋतुजा लटके: उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात?

facebook
अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आलीये. मुंबई महापालिका कर्मचारी असल्याने त्यांच्या उमेदवारीत प्रशासकीय अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप पालिकेने मंजूर केलेला नाही. राजीनामा मंजूर झाल्याशिवाय त्या निवडणूक लढू शकणार नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांची पळापळ सुरु झालीये.
 
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झालाय का? या प्रश्नावर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे."
 
ऋतुला लटके शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्षात अंधेरीची पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जातेय. शिंदे गटानेही या जागेवर आपला दावा सोडलेला नाही.
 
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीत अडचण काय?
ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीतील सर्वात मोठा अडसर म्हणजे, त्या मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांनी महिन्याभरापूर्वी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला.
 
मात्र, त्यांचा राजीनामा अर्ज अजूनही मुंबई महापालिकेकडून मंजूर करण्यात आलेला नाही.
निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे, सरकारी कर्मचारी असल्याने राजीनामा मंजूर झाल्याशिवाय ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
 
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 14 ऑक्टोबर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची धावाधाव सुरू झाली आहे.
 
उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परब आणि इतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतलीये. त्याचसोबत सामान्य प्रशासन विभागात राजीनामा लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी पळापळ सुरू केलीय.
 
शिवसेना नेत्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके मुंबई महापालिका उपायुक्त कार्यालयात त्या क्लर्क पदावर कार्यरत आहेत. हा विभाग महापालिका आयुक्तांच्या अंतर्गत येतो. त्यामुळे पालिका आयुक्त राजीनाम्यावर निर्णय घेतील.
 
ऋुतुजा लटके यांचा राजीनामा महापालिका आयुक्तांनी नामंजूर केल्यास, येणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
ऋुतुजा लटके यांच्या उमेदवारीत असलेल्या प्रशासकीय अडचणींबाबत माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "महापालिका आयुक्तांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ मंजूर केला पाहिजे. राजीनामा मंजूर करण्यात अडवणूक करणं योग्य नाही." या आधी अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा देऊन निवडणुका लढवल्या आहेत.
 
"ऋतुजा यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलाय. पालिका आयुक्तांनी राज्य सरकारच्या गन पॉइंटवर काम करू नये," असं किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या.
 
ऋुतुजा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले पालिका आयुक्त?
 
ऋुतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत बीबीसी मराठी ने पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले, "ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे."
 
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पालिका अधिकारी म्हणाले, ऋतुजा लटके क्लास-3 (तृतीय क्षेणी) कर्मचारी आहेत. त्यांना एक महिन्याचा नोटीस पिरिएड किंवा नोटीस पिरिएड माफ केल्यास एक महिन्याचा पगार द्यावा लागेल. त्यासाठी मुंबई महापालिकेला त्यांचा राजीनामा मंजूर करावा लागेल.
 
शिंदे गट लढवणार अंधेरीची निवडणूक?
राजकीय जाणकारांच्या मते अंधेरीची पोटनिवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट पहाता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेचा मानली जात आहे.
 
वरिष्ठ राजकीय विश्लेषक निखिल वागळे बीबीसीशी बोलताना म्हणतात, "उद्धव ठाकरेंसाठी अंधेरीची पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि कसोटीची असणार आहे. या निवडणूक निकालावर ठाकरे गटाची पुढील खरी कसोटी आहे."
 
भाजपने अंधेरी पोट निवडणुकीसाठी मुरजी पटेल उमेदवार असतील असं जाहीर केलंय. तर, दुसरीकडे शिंदे गटानेही अंधेरीच्या जागेवर दावा सोडला नसल्याचं म्हटलं. पण भाजपने उमेदवार दिल्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून आलंय.
 
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी, आम्ही अंधेरीच्या जागेवर दावा सोडणार नाही. कोणी उमेदवार जाहीर केला म्हणजे तो अंतीम निर्णय होत नाही असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांना टोला हाणलाय.
 
अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालंय. पण, ठाकरे विरुद्ध शिंदे हा सत्तासंघर्ष पहाता ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून दोन्ही गट पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
 
भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत?
भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका केशरबेन यांनी साधारण 2015-16 या काळात काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला.
 
मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन या 2012 साली काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका होत्या.
 
त्यानंतर 2017 मध्ये मुरजी पटेल आणि केशरबेन पटेल दोघंही भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले. परंतु जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्यांचं नगरसेवकपद रद्द झालं. कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं.
 
2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. तर 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
 
अंधेरी पूर्व मतदारसंघातून रमेश लटके 2014 आणि 2019 असे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्याआधी 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
 
ऋतुजा लटके या यापूर्वी राजकारणात सक्रिय नव्हत्या. त्या मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होत्या. परंतु रमेश लटके वयाच्या 21 व्या वर्षापासून शिवसेनेत सक्रिय होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचाही राजकारणाशी जवळून संबंध राहिला आहे.
 
आगामी काळात या निवडणुकीवरून राजकारण आणखी तापलेलं दिसेल. शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह बदलल्याने शिवसेनेला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे. तर एकनाथ शिंदे गट या निवडणुकीसाठी आपला उमेदवार उभा करणार की केवळ भाजपाला मदत करण्यासाठी ही त्यांची राजकीय खेळी होती हे सुद्धा पुढील काळात स्पष्ट होईल असं जाणकार सांगतात.
 
Published By- Priya Dixit