मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (11:09 IST)

मुरजी पटेल, ऋतुजा लटके: अंधेरी पूर्व मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण बाजी मारणार?

eknath uddhav
मुरजी पटेल, ऋतुजा लटके: अंधेरी पूर्व मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण बाजी मारणार?
मुंबईतील एका विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचं 'धनुष्यबाण' बदलण्यापासून ते 'शिवसेना' नाव वापरण्यास मनाई करेपर्यंत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष इतका टोकाला गेला.
 
याच मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव गमवावं लागलं आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्हसुद्धा गोठवण्यात आलं.
 
अंधेरी पूर्व मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि खरी शिवसेना कोणाची? या लढाईसाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना पहिलं रणांगण मिळालं. म्हणूनच मुंबईतील ही पोटनिवडणूक महत्त्वाची ठरत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
 
यानिमित्त जाणून घेऊया की, भाजप-शिंदे युतीच्या डावपेचात उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण अस्तित्व पणाला लागलेला हा मतदारसंघ नेमका कसा आहे? मतदारसंघातील राजकीय समीकरणं काय आहेत? भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल कोण आहेत? आणि शिवसेनेचं मतदार संघावर किती प्राबल्य आहे? ही निवडणूक नेमकी कोणासाठी आव्हानात्मक आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
 
मुख्य लढत कोणामध्ये होणार?
'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हा पक्ष (उद्धव ठाकरे) 'मशाल' घेऊन या पोटनिवडणुकीत उतरणार तर 'बाळासाहेबांची शिवसेना' (एकनाथ शिंदे गट) या पक्षाला या निवडणुकीसाठी ढाल तलवार चिन्ह मिळालं आहे. शिंदे गटाने अद्याप या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली नाही.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा आदेश केवळ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी असला तरी शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेना नक्की कोणाची याची कायदेशीर लढाई सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचं लक्ष याकडे लागलं आहे.
 
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व येथून विजयी झालेले शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात आता पोटनिवडणूक होत आहे.
 
शिवसेनेने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋजूता लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीसाठी मात्र काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्हे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचं चित्र आहे.
 
'बाळासाहेबांची शिवसेना' म्हणजेच एकनाथ शिंदे गटाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही आणि ते ही निवडणूक लढवणार आहेत की नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं नाही.
भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप-एकनाथ शिंदे 'युती' अशी ही लढत होणार आहे. म्हणजेच ऋतुजा लटके विरुद्ध मुरजी पटेल असा हा सामना रंगणार आहे.
 
कोणाचे किती नगरसेवक?
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाअंतर्गत एकूण 8 वॉर्ड आहेत. यापैकी काही वॉर्ड हे पूर्णपणे मतदारसंघात आहेत तर काहींचा काही भाग मतदारसंघाच्या बाहेर आहे.
 
मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. तरी गेली पाच वर्ष कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक या विधानसभा मतदारसंघात निवडून आले ते पाहूया,
 
नगरसेवकांची आकडेवारी पाहिल्यास या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे 4, भाजपाचे 2 आणि काँग्रेसचे 2 माजी नगरसेवक आहेत.
 
काँग्रेसचा बालेकिल्ला नंतर शिवसेनेचा बनला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी याच अंधेरी पूर्व मतदार संघातून तीन टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत.
 
आघाडी सरकारच्या काळात ते आरोग्यमंत्री होते. त्यामुळे साधारण 2014 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु 2014 मध्ये सुरेश शेट्टी यांचा पराभव झाला.
 
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी यांनी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 2014 मध्ये रमेश लटके यांनी विधानसभा निवडणुकीत सुरेश शेट्टी यांचा पराभव केला होता.
 
2014 मध्ये विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांनी सुरेश शेट्टी यांचा पराभव करत काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर ढकललं होतं. भाजपचे उमेदवार सुनील यादव त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर होते.
 
2019 मध्ये भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभा निवडणूक लढवली. तत्कालीन आमदार रमेश लटके यांना युतीने उमेदवारी दिली. तर 2015-16 मध्ये भाजपात प्रवेश केलेल्या मुरजी पटेल यांनी 2019 विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती.
 
आता याच मुरजी पटेल यांना भाजपाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
 
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती.
 
आता काँग्रेसने उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचं ठरवल्याने या मतदारसंघात काँग्रेसचे मतदार किती आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो.
 
2019 मध्ये जगदीश अमीन कुट्टी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ज्यांना जवळपास 28 हजार मतं मिळाली होती.
 
संमिश्र मतदारांचा मतदारसंघ
अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदारांची संख्या जवळपास 2 लाख 70 हजार एवढी आहे. उच्चभ्रू वसाहती, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्ट्या अशी संमिश्र वस्ती या भागात आहे. यात मराठी भाषिक, उत्तर भारतीय, मुस्लीम, ख्रिश्चन मतदार मोठ्या संख्येने असल्याचं जाणकार सांगतात.
 
अंधेरी पूर्वेकडील सकीनाका, एमआयडीसी, वीर नेताजी पालकर चौक, गोंदवली, अंधेरी-कुर्ला रोड, भवानी नगर, विजय नगर, पवईचा काही भाग, इ. हे परिसर या मतदारसंघात आहेत.
 
ज्येष्ठ पत्रकार सचिन धनजी सांगतात, "काँग्रेसचे सुरेश शेट्टी तीन टर्म आमदार होते. त्यामुळे काँग्रेसचं वर्चस्व या मतदारसंघात होतं. परंतु 2014 नंतर हे चित्र बदललं आणि त्यानंतर दोन वेळा शिवसेनेचे रमेश लटके निवडून आले. पण इथे एक महत्त्वाची बाब म्हणजे 2014 मध्ये रमेश लटके विजयी झाले होते परंतु भाजपचे उमेदवार सुनील यादव यांचा केवळ 5 हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये आताचे भाजपचे उमेदवर मुरजी पटेल अपक्ष निवडणूक लढले आणि तरीही त्यांनी 45 हजार मतं मिळवली. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे मतदार सुद्धा लक्षणीय आहेत हे स्पष्ट होतं. त्यामुळे हा सामना अटीतटीचा होऊ शकतो."
 
"रमेश लटके यांचं निधन झालं आहे आणि त्यांच्या पत्नी निवडणुकीला उभ्या आहेत यामुळे सुद्धा फरक पडू शकतो. आता शिवसेनेसाठी जमेची बाजू म्हणजे या मतदारसंघातले काँग्रेसचे मतदार शिवसेनेला मतदान करू शकतात. तसंच सहानुभूतीच्या जोरावरही शिवसेना बाजी मारू शकते. पण उद्धव ठाकरेंकडे आता धनुष्यबाण हे चिन्ह नाही. त्यामुळे मतदारांपर्यंत मशाल पोहचवण्यासाठी त्यांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. या मतदारसंघ संमिश्र असल्याने शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचा प्रभाव दिसून येतो."
 
भाजपा आणि शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत?
भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका केशरबेन यांनी साधारण 2015-16 या काळात काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला.
 
मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन या 2012 साली काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका होत्या.
 
त्यानंतर 2017 मध्ये मुरजी पटेल आणि केशरबेन पटेल दोघंही भाजपच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले. परंतु जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून त्यांचं नगरसेवकपद रद्द झालं. कोर्टाने त्यांना अपात्र ठरवलं होतं.
2019 मध्ये विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यावर मुरजी पटेल यांनी अपक्ष ही निवडणूक लढवली. तर 2020 मध्ये मुरजी पटेल यांची भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.
 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
 
अंधेरी पूर्व मतदारसंघातून रमेश लटके 2014 आणि 2019 असे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्याआधी 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
 
ऋतुजा लटके या यापूर्वी राजकारणात सक्रिय नव्हत्या. त्या मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होत्या. परंतु रमेश लटके वयाच्या 21 व्या वर्षापासून शिवसेनेत सक्रिय होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचाही राजकारणाशी जवळून संबंध राहिला आहे.
 
आगामी काळात या निवडणुकीवरून राजकारण आणखी तापलेलं दिसेल. शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह बदलल्याने शिवसेनेला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे. तर एकनाथ शिंदे गट या निवडणुकीसाठी आपला उमेदवार उभा करणार की केवळ भाजपाला मदत करण्यासाठी ही त्यांची राजकीय खेळी होती हे सुद्धा पुढील काळात स्पष्ट होईल असं जाणकार सांगतात.
 
Published By- Priya Dixit