रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
लोकमान्य टिळक यांचे खापरपणतू रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असून ते लवकरच शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने टिळक कुटुंबाशी अंतर ठेवण्यास सुरुवात केल्याने हा निर्णय घेतल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडण्याची कारणे स्पष्ट केली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केल्यापासून काँग्रेस पक्षाने त्यांच्या कुटुंबापासून अंतर ठेवण्यास सुरु केले. मोदींपूर्वी हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि प्रणव मुखर्जी यांना दिला होता.
लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार कधीही पक्षीय विचार न पाहता दिला जातो. संबंधित व्यक्तीच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा विचार करूनच हा पुरस्कार देण्यात येतो. मग मोदींना दिल्यावर काँग्रेसने आक्षेप का घेतला?
या प्रकरणात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला आपली भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळेच मी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा विचार केला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)कडून रोहित टिळक यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील ती जबाबदारी स्वीकारण्यास असल्याचे रोहित टिळक म्हणाले.
रोहित टिळक यांनीही काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच 2009 आणि 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी हाताळली आहे. अद्याप त्यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
Edited By - Priya Dixit