साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार प्रदान
प्रसिद्ध लेखिका सोनाली नवांगुळ यांना मराठी भाषेसाठी तर ख्यातनाम लेखिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेकरिता आज साहित्य अकादमीचे मानाचे अनुवाद पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हा पुरस्कार आयुष्यातील महत्त्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा असल्याच्या भावना श्रीमती नवांगुळ यांनी व्यक्त केल्या असून डॉ. कुलकर्णी यांनी या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेप्रति ऋणनिर्देश व्यक्त केले.
येथील कोपर्निकस मार्ग स्थित साहित्य अकादमीच्या रविंद्र सभागृहात वर्ष 2020च्या अनुवाद पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते देशातील 24 प्रादेशिक भाषांतील अनुवादकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
आयुष्यातील महत्त्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा सन्मान – सोनाली नवांगुळ
देशभरातील २४ प्रादेशिक भाषेतील नामवंत साहित्यिकांसह मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीचा मानाचा अनुवादाचा पुरस्कार प्राप्त करणे हा आयुष्यातील महत्त्वाचा व आत्मविश्वास वाढविणारा सन्मान असल्याच्या भावना सोनाली नवांगुळ यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केल्या. अपंग व्यक्ती दर्जेदार साहित्यनिर्मिती करू शकत नाही अशा दृष्टीकोणातून बघितले जात नाही उलट त्यांना सहानुभूती दिली जाते. मात्र, आपल्या मनात असले व आपल्या भाषेवर प्रेम असेल तर अतिशय उत्कृष्ट कार्य आपण करू शकतो व त्याची शाबासकीही मिळू शकते हा आत्मविश्वासच या पुरस्काराने दिल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती नवांगुळ यांनी अपंगत्वावर मात करत साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांनी तामिळ भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तकासाठी सन्मानित करण्यात आले. लेखिका सलमा यांच्या इरंदम जामथिन कथाइ या तामिळ भाषेतील कादंबरीचे मराठी अनुवादित मध्यरात्रीनंतरचे तास हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाच्या भारतातील लेखिका या लेखमालेतील 2015 मध्ये प्रकाशित पुस्तक होय.
पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार – डॉ. मंजुषा कुलकर्णी
आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी केलेले समाज कार्य हे संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्मकथनाचा संस्कृत भाषेत अनुवाद करणे महा खडतर असे कार्य होते. संस्कृत ही भारताचा आत्मा व्यक्त करणारी भाषा असून या भाषेतून व्यक्त झालेल्या कलाकृती चिरकालीन व अजरामर होतात म्हणूनच डॉ प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या आत्मकथनाचा प्रकाशमार्गा: हा संस्कृत भाषेतील अनुवाद करण्याचे खडतर कार्य यशस्वीपणे पूर्ण केले. या कार्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील तमान जनतेचा व संस्कृततज्ज्ञांचे आभारही मानले.
डॉ कुलकर्णी यांची 25 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले आहे. लेखिका, कवयित्री, व्याख्याता आणि निवेदिका म्हणून त्या प्रसिध्द आहेत तसेच त्यांनी नाट्यप्रयोगही केले आहेत.