रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (21:32 IST)

सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

सोनाली नवांगुळ यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ तमिळ भाषेतील हे पुस्तक फ्रँचसह अन्य चार भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तर, मंजुषा कुलकर्णी यांना प्रकाशवाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
सोनाली प्रकाश नवांगुळ, (मूळ गाव- बत्तीस शिराळा) वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या त्यांनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर २००० साली त्या कोल्हापुरात आल्या. हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेत २००७ पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले. सोनाली नवांगुळ या भारतातल्या ‘स्पर्शज्ञान’ नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून ‘रिलायन्स दृष्टी’ या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात; मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात. अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद’ हे पुस्तक ‘मेनका प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.
 
दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणार्‍या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर’ या नावाने ‘मनोविकास’ने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता ‘मनोविकास’ प्रकाशनाची कविता महाजन यांनी संपादित केलेली जी पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावाने मराठीत आणली आहे. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या ‘अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषविले आहे