शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (14:58 IST)

अमृता प्रीतम : साहिर लुधियानवी आणि इमरोज पलिकडेही ज्यांचं जग होतं...

- वंदना
संपादक (टीव्ही), भारतीय भाषा
किस्सा 1958 चा आहे. व्हिएतनामचे राष्ट्रपती हो-ची-मिन्ह भारताच्या दौऱ्यावर होते.
 
नेहरूंशी त्यांची चांगली मैत्री होती. हो-ची-मिन्ह यांच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम आयोजित केला गेला ज्यात लेखिका अमृता प्रीतम यांनाही आमंत्रित केलं गेलं होतं. तोपर्यंत अमृता प्रीतम यांचं साहित्य क्षेत्रात मोठं नाव झालं होतं.
 
हो-ची-मिन्ह यांची प्रतिमा तेव्हा अमेरिकेला धुळ चारणारा नेता अशी झाली होती. 1958 च्या त्या संध्याकाळी दोघांची भेट झाली.
 
हो-ची-मिन्ह यांनी अमृतांच्या कपाळाचं चुंबन घेत म्हटलं, "आपण दोघं सैनिक आहोत. तू लेखणीने लढतेस आणि मी तलवारीने."
 
याचा उल्लेख स्वतः अमृता प्रीतम यांनी एका दूरदर्शनच्या मुलाखतीत केला आहे.
 
साहिर आणि इमरोज यांचे किस्से
हो-ची-मिन्ह यांनी जे म्हटलं त्यात काहीच वावगं नाही. 100 वर्षांपूर्वी 31 ऑगस्ट 1919 साली पाकिस्तानात जन्मलेल्या अमृता प्रीतम लेखणीच्या सैनिक होत्या. त्यांनी पंजाबी आणि हिंदी भाषेत कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या.
 
अमृता प्रीतम यांच नाव येतं तेव्हा गीतकार-शायर साहिर लुधियानवी आणि चित्रकार इमरोज यांचा उल्लेख येतोच.
 
पण साहिर आणि इमरोज सोडूनही अमृता प्रीतम यांची एक ओळख होती. ती ओळख म्हणजे त्यांच्या लेखणीतून निघालेल्या त्या कहाण्या ज्यांनी स्त्रीमनाचं यथार्थ चित्रण उभं केलं.
 
फाळणीच्या वेदना
1959 साली पाकिस्तानात एक चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं कर्तार सिंग. यात झुबैदा खानम आणि इनायत हुसेन यांनी काम केलं होतं. या चित्रपटातलं एक गाणं आहे - 'अज्ज आखां वारिस शाह नूँ कितों कबरां विच्चों बोल.'
 
ही रचना अमृता प्रीतम यांची होती.
 
अमृता 1947 साली लाहोर सोडून भारतात आल्या. फाळणीच्या दुःखावर लिहिलेली त्यांची कविता 'अज्ज आखां वारिस शाह नूँ' सीमेअल्याड आणि सीमेपल्याडच्या लोकांचं दुःख व्यक्त करते. त्यांचं दुःख, वेदना कशा सारख्याच आहेत हे सांगते. वेदनेला कोणती सीमारेषा नसते हे सांगते.
 
या कवितेत अमृता प्रीतम म्हणतात, "जेव्हा पंजाबात एक लेक रडली तेव्हा (कवी) वारिस शाह तू तिची गोष्ट लिहिलीस. हीरची गोष्ट. आज तर लाखो लेकी रडताहेत. आज तू तुझ्या कबरीतून बोल... उठ, आणि पाहा आपला पंजाब जिथे लाखो मृतदेह पडलेत. चिनाबमध्ये आता पाणी नाही तर रक्त वाहतंय. हीरला विष खाऊ घालणारा एक काका कैदो होता, आता तर सगळेच काका कैदो झालेत."
 
फाळणीच्या काळात अमृता प्रीतम गरोदर होत्या आणि तेव्हा त्यांना सगळं सोडून 1947 साली लाहोरमधून भारतात यावं लागलं. फाळणीच्या काळात सगळीकडे झालेला विध्वंस त्यांना दिसलं. तेव्हा ट्रेनने लाहोरहून डेहराडूनला येताना एका कागदाच्या कपट्यावर त्यांनी ही कविता लिहिली होती.
 
या कवितेतून त्यांनी त्या सगळ्या बायकांच्या वेदना मांडल्या होत्या ज्या फाळणीदरम्यान मारल्या गेल्या होत्या, ज्यांच्यावर बलात्कार झाले होते, ज्यांच्या मुलांना डोळ्यादेखत मारून टाकण्यात आलं होतं किंवा ज्यांनी स्वतःला हिंसेपासून वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारून जीव दिला होता.
 
अनेक वर्षं ही कविता पाकिस्तानातल्या वारिस शाह यांच्या दर्ग्यावर भरणाऱ्या उरूसाच्या वेळेस ही कविता गायली जात होती.
अमृता प्रीतम यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, "एकदा एक गृहस्थ पाकिस्तानातून भारतात आले आणि त्यांनी मला केळी दिल्या. त्यांना ती केळी एका पाकिस्तानी माणसानी दिली होती आणि म्हटलं होतं की तुम्ही 'अज्ज आखां वारिस' लिहिणाऱ्या अमृता प्रीतम यांन भेटायला जात आहात ना, त्यांना माझ्याकडून ही केळी द्या. मी इतकंच देऊ शकतो. माझी अर्धी हज यात्रा यातच होईल."
 
बाईचं जगणं मांडणारी लेखणी
अनेक वर्षांपूर्वी अमृता प्रीतम यांनी एका जुन्या मुलाखतीत या ओळी ऐकवल्या होत्या, "कोणतीही मुलगी... हिंदू असो वा मुस्लीम, आपल्या इच्छित स्थळी पोहोचली तर समजा की 'पुरो' चा आत्माही इच्छित स्थळी पोहोचला."
 
या ओळींचा अर्थ आधी नीट समजला नाही. पण एक दिवस अमृता प्रीतम यांची 'पिंजर' नावाची कादंबरी वाचण्यात आली. त्याच कादंबरीवर बेतलेला 'पिंजर' नावाचा चित्रपटही आलाय, तोही पाहिला.
 
यात 'पुरो' (उर्मिला मातोंडकर) नावाच्या हिंदू मुलीची कथा आहे जी भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळेस पंजाब झालेल्या हिंसाचाराच्या तावडीत सापडते.
 
पुरो साखरपुड्यानंतर आपला होणारा पती रामचंद याच्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहात असते, पण याआधीच तिचं एक मुस्लीम मुलगा अपहरण करतो आणि तिच्याशी लग्न करतो. पुरोला दिवस जातात तेव्हा ती या घटनेला आपल्या शरीराशी आणि मनाशी झालेला धोका समजते.
 
याच काळात फाळणीच्या वेळेचा हिंसाचार उफाळून येतो आणि आणखी एका मुलीचं अपहरण होतं.
 
पुरो या काळात आपला जीव पणाला लावून तिला वाचवते आणि सहीसलामत तिच्या नवऱ्याकडे नेऊन सोडते. तो मुलगा तिचा सख्खा भाऊ असतो.
 
तेव्हा तिच्या मनात हे शब्द उमटतात, "कोणतीही मुलगी... हिंदू असो वा मुस्लीम, आपल्या इच्छित स्थळी पोहोचली तर समजा की 'पुरो'चा आत्माही इच्छित स्थळी पोहोचला."
 
जेव्हा एका नव्या जाणीवेसह पुरोचे हे शब्द आले तेव्हा अंगावर काटा आला. अमृता प्रीतम यांनी ज्या प्रकारे बाईची स्वप्नं, तिच्या इच्छा-आकांक्षा, तिचं भय आणि तिच्यासोबत झालेले अत्याचार यांना शब्दरूप केलं, त्या काळात ही नवलाईची गोष्ट होती.
 
समाजाच्या चौकटी न मानणारं हळूवार प्रेम
यानंतर अनेक वर्षं त्या वेगवेगळ्या कथा लिहित राहिल्या ज्या स्त्री-पुरुषाच्या नात्याचा धांडोळा बाईच्या नजरेने घेतला होता. उदाहरणार्थ त्यांची कादंबरी 'धरती, सागर ते सीपिया'.
 
यावर 70 च्या दशकात कादंबरी नावाचा चित्रपट आला होता ज्यात शबाना आझमी यांनी भूमिका केली होती. ही एका अशा मुलीची कहाणी होती जी कोणत्याही अटी-शर्तीशिवाय प्रेम करते आणि जेव्हा समोरची व्यक्ती प्रेमावर आपल्या अटी-शर्ती लादते तेव्हा या प्रेमाचं ओझं होऊ नये म्हणून स्वतःचा रस्ता स्वतः निवडते.
 
पण अमृता प्रीतम यांच्यावर कधी टीका झालीच नाही असं नाही. टीकाकारांमध्ये त्यांचे सहकारी खुशवंत सिंगही होते.
आऊटलुक मासिकातल्या आपल्या लेखात खुशवंत सिंग यांनी 2005 साली लिहिलं होतं की, "त्यांच्या (अमृता प्रीतम) कथांमधली पात्रं कधीही जिवंत होऊन समोर आली नाहीत. अमृतांची कविता 'अज्ज आखां वारिस शाह नू' भारत-पाकिस्तान दोन्हीकडे गाजली. या दहा ओळींनी त्यांना दोन्ही देशांमध्ये अजरामर केलं.
 
मी 'पिंजर' कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद केला तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की याच्या बदल्यात त्यांनी मला त्यांच्या आणि साहिर यांच्या आयुष्याविषयी सविस्तर सांगावं. त्यांची कथा ऐकून मात्र मी निराश झालो. मी म्हटलं हे तर एका तिकिटावरही लिहिता येईल. त्यांनी ज्या प्रकारे साहित्य अकादमी पुरस्कार जिंकला तो किस्साही निराशाजनक होता."
 
रसीदी टिकट
ती तिकिटाची गोष्ट कदाचित अमृता प्रीतम यांना खटकली. त्यांनी नंतर आपलं आत्मचरित्र लिहिलं ज्याचं नाव ठेवलं, 'रसीदी टिकट'. यात साहिर लुधियानवी यांचे अनेक किस्से होते.
 
या पुस्तकात एका ठिकाणी अमृता प्रीतम लिहितात, "तो (साहिर) गुपचूप माझ्या खोलीत सिगरेट प्यायचा. अर्धवट पिऊन झाली की सिगरेट विझवून टाकायचा आणि नवी सिगरेट पेटवायचा. जेव्हा तो खोलीतून निघून जायचा तेव्हा त्याच्या सिगरेटचा वास खोलीत दरवळत असायचा.
 
मी त्याने अर्धवट विझवलेल्या सिगरेटची थोटकं सांभाळून ठेवायचे आणि एकट्याने पुन्हा ती थोटकं पेटवायचे. मी ती थोटकं माझ्या बोटांमध्ये पकडायचे तेव्हा वाटायचं की मी साहिरच्या हातांना स्पर्श करतेय. अशी मला सिगरेट ओढण्याची सवय लागली."
 
अमृता आणि साहिरचं नातं आयुष्यभर चाललं खरं पण त्याला कोणतंही मूर्त स्वरूप आलं नाही. याच दरम्यान अमृतांच्या आयुष्याच चित्रकार इमरोज आले. दोघं आयुष्यभर एका घरात राहिले पण त्यांनी समाजाच्या नियमांप्रमाणे कधी लग्न केलं नाही.
 
इमरोज अमृतांना म्हणायचे - तूच माझा समाज आहेस.
 
हे नातंही वेगळंच होतं. इमरोज यांना अमृता यांच्या मनात असलेली साहिरची ओढ माहिती होती.
 
बीबीसीच्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, "अमृताची बोटं कायम काही ना काही लिहित असायची. त्यांच्या हातात लेखणी असली नसली तरी त्यांना फरक पडायचा नाही. त्यांनी अनेकदा माझ्या पाठीवर बोटाने साहिरचं नाव लिहिलंय. पण काय फरक पडतो. अमृताचं साहिरवर प्रेम असलं तर असेल पण माझं त्यांच्यावर प्रेम आहे."
 
अमृतांच्या आयुष्याचे अनेक पैलू होते. त्या ओशोंशी जोडल्या गेल्या.
 
लहानपणी झालेला आईचा मृत्यू, फाळणीचं दुःख, एक असं लग्न ज्यात त्या वर्षानुवर्ष घुसमटत राहिल्या. साहिरवर केलेलं प्रेम आणि मग लांब जाणं, इमरोजचा सहवास. अमृता प्रीतम यांचं जीवन सुखदुःखाने भरलेलं होतं.
 
दुःखाच्या छायेतही त्या आपल्या शब्दांनी आशेची किरणं जागवतात जे जेव्हा त्या लिहितात -
 
दुःखद शेवट तो नसतो जेव्हा आयुष्याच्या लांब वाटेवर समाजाची बंधनं काटे पेरत राहतील आणि तुमचे पाय आयुष्यभर रक्तबंबाळ होत राहतील.
 
दुःखद शेवट तो असोत जेव्हा तुमच्या रक्तबंबाळ पायांनी तुम्ही एकाच ठिकाणी उभे राहाता आणि समोरून कोणताही रस्ता तुम्हाला बोलवत नसतो.