शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (21:25 IST)

समीर वानखेडेंमागे चौकशी; NCBपाठोपाठ आता राज्य सरकारचीही समिती

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात २५ कोटी रुपयांच्या डील प्रकरणात राज्य सरकारतर्फे चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकरणी एनसीबीकडूनही यापूर्वी स्वतंत्र चौकशीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून दररोज वेगवेगळे आरोप होत असल्याने घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकार आणि एनसीबी अशा दुहेरी चौकशीच्या फेर्यात अडकले आहे.
 
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी २५ कोटी रुपयांची डील करण्यात आली होती. यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते, असा धक्कादायक आरोप ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
 
प्रभाकर साईल, अॅड. सुधा द्विवेदी, अॅड. कनिष्का जैन, नितीश देशमुख यांनी केलेल्या तक्रारींची दखल राज्य सरकारतर्फे घेण्यात आली. चौकशीसाठी चार पोलिस अधिकार्यांची नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले, पोलिस निरीक्षक अजय सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पारकर, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी यांचा समावेश आहे.
 
आर्यन खान प्रकरणात अॅड. कनिष्ठ जयंत यांनीही तक्रार दिली आहे. १२ आणि १६ ऑक्टोबरला के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांच्याविरुद्ध तक्रार दिल्याची माहिती अॅड. जयंत यांनी माध्यमांना दिली. या सर्वांनी एकत्र येऊन कट रचून आर्यनचे अपहरण केले आणि कोट्यवधींची खंडणी शाहरूख खानच्या वकिलांकडून मागितली, अशी लेखी तक्रार त्यांनी दिली आहे. रमीर वानखेडे यांनी खंडणी उकळण्यास आणि अपहरण करण्यास पाठबळ दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.