शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (08:19 IST)

समीर वानखेडे यांची आंतरराष्ट्रीय ड्रग सप्लायरशी मैत्री; मलिकांचे आणखी आरोप

nawab malik
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज सकाळीच एक पत्रकार परिषद घेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. मलिक म्हणाले की, वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग सप्लायरशी मैत्री आहे. हा ड्रग सप्लायर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत क्रूझ ड्रग पार्टीत सहभागी होता.  बंदूकधारी तो दाढीवाला होता. वानखेडेंनी गोव्यातही त्याच्यासोबत मोठे व्यवहार केले आहेत. एनसीबीला आम्ही सर्व व्हिडिओ आणि पुरावे देणार आहोत. आपण सर्वांनी लिहून घ्या. वानखेडे यांची नोकरी जाणारच, असा दावा मलिक यांनी केला आहे.
 
क्रूझ ड्रग पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान आढळून आला. तो सध्या तुरुंगात आहे. गेल्या काही दिवसांपासून या सर्व प्रकरणात अनेकानेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास वानखेडे करीत आहेत. तर, मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधात आरोपांची राळ उठविली आहे. दररोज ते विविध प्रकारचे आरोप आणि गौप्यस्फोट करीत आहेत. एनसीबीने मालदिवच्या पार्टीची माहिती काढावी त्यात बरेच काही स्पष्ट होईल, असे मलिक यांनी म्हटले आहे.
 
मलिक यांनी यावेळी भाजपवरही कडाडून टीका केली. जे काही आरोप होत आहेत ते समीर वानखेडेंवर आहेत, मग भाजपचा जीव का खाली-वर होतोय? भाजपचा जीव एनसीबीमध्ये अडकला आहे का? एनसीबी म्हणजे भाजपचा पोपट आहे का? भाजपने इतकी फडफड करण्याचे कारण काय? अशा प्रश्नांची सरबत्ती करुन मलिक यांनी भाजपला लक्ष्य केले.