शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (08:17 IST)

‘जनाब संजय राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय’

मागील काही दिवसांपासून मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुनराज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणावरून आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत  यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, असा सणसणीत टोला चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर लगावला.
 
त्यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, नगरमध्ये ज्या हिंदूस्थानद्रोही लोकांनी पाकिस्तानच्या विजयाचा घोषणा दिल्या आणि त्यांना विरोध करणाऱ्यांचे डोके फोडले जातात आणि तुमची यंत्रणा मात्र उलट विरोध करणाऱ्यांवरच कारवाई करते, यावर तुम्हाला बोलायचं नाही.कारण जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या  नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय. न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
 
जनाब संजय राऊत  तुम्हाला समीर वानखेडे  हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे.हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे. कोकणातील वादळग्रस्तांना मोबादला मिळत नाही, शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाले नाहीत.मराठाड्यात अतिवृष्टीने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाहीये, आरोग्य विभागात घोटाळा होतोय, एमपीएससीच्या तरूणांचे भविष्य अंधारात ढकललं जातंय.रोज राज्यातील लहान मुली, महिला यांवर लैंगिक अत्याचार होतायत. या सगळ्या विषयांवरती आपल्याला भाष्य करायचे नाहीये.पण तुम्हाला एनसीबी सारख्या स्वायत्त संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरून टार्गेट करायचं, त्याच्यावर पर्सनल अटॅक करून त्याच्या कामावर फक्त दबाव आणायचा आहे.असा आरोप चित्रा वाघ  यांनी केला.