रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (15:57 IST)

संजय राऊत यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की…- किरीट सोमय्या

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना बुधवारी एक पत्र लिहिले होते. भाजपच्या ताब्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्मार्ट सिटीत 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा करत या प्रकरणी तुम्ही ईडीकडे चौकशीची मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल, अशी अपेक्षा राऊत यांनी केली व्यक्त केली होती. त्यावर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया आली आहे. राऊत यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचे आहे, असे सोमय्या म्हणाले.
 
पिंपरी-चिंचवड स्मार्ट लिमिटेड कंपनीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीतील झोल बाबत महापालिका सभागृहात बुधवारी पाच तास चर्चा केली. त्यातच भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचे सांगत असणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्र लिहून भाजपच्या ताब्यातील महापालिकेतील स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची माहिती देत ‘ईडी’कडे तक्रार करण्याचे आव्हान दिले होते.
 
त्यावर मुंबईत पत्रकारांशी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावे? कारण, त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केली आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाप्रती आस्था प्रदर्शित केली आहे, हे आधी मला समजून घ्यायचे आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टता करावी. प्रवक्त्यांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचे प्रशासन आणि त्यांच्या कार्यक्षमतेच कौतुक केले असून ठाकरे सरकारच्या कार्यक्षमतेसंबंधी चिंताही व्यक्त केली आहे”.