दोन्ही भाऊ भावाच्या खुनाच्या तपासाबद्दल विचारणा करायला गेले होते. मात्र पोलिसांनी योग्य उत्तर दिलेच नाही त्यामुळे यांचा संताप अनावर झाला. त्याच ठिकाणी स्टेशन समोर चौकात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. इतके भयानक प्रकरण असून सुद्धा प्रशासन मात्र ढिम्म आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करतांना दिसत नाही त्यामुळे सर्वत्र पोलीस यंत्रणा आणि सरकारवर जोरदार टीका होत आहे.