संजय राऊत हे सरकारचे आवाज, त्यांनी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करावे : चंद्रकांत पाटील
सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आहेत. या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला याप्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्विट केले होते. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी याचा समाचार घेत म्हटले, की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला याप्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा.
तसेच कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून, त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजनांवर अधिकाधिक भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.