सरकार पडणार नाही म्हटल्यानंतर ईडीचं सत्र सुरु: संजय राऊत
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न असला तरी महाराष्ट्र बेईमान नाही. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो आणि नुसते हल्लेच नाहीत तर याच वास्तूच्या खाली अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत, अशात सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली असून याला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्याने मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार म्हणून आधी त्याचं थोबाड बंद करा. संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख 'मुलुंडचा दलाल' असा केला आहे. PMC बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी किरीट सोमय्यांचे आर्थिक संबध असल्याचा मोठा खुलासा संजय राऊत यांनी केला. तसंच वाधवान यांनी भाजपला कोट्यवधी रुपये दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांचं संकट महाराष्ट्रासह पश्चिम बंगालवर असल्याचं देखील म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की सरकार पडणार नाही असं विधान केल्यानंतर माझ्या जवळपासच्या लोकांवर ईडीचं सत्र सुरु झालं. माझी बँक खाती असलेल्या कार्यालयात ईडीचे लोक गेले. मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणाऱ्यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. तसेच तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आली, असं संजय राऊत यांनी सांगितिलं आहे.