शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (09:18 IST)

संतपीठ सीबीएसई स्कूल प्रवेशासाठी आज 'सोडत'

पहिल्या वर्षासाठी ३ वर्गांत १२० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ व सीबीएसई स्कूलच्या पहिल्या वर्षाकरीता १२० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. आज (दि.२२ जुलै)लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. एकूण प्रवेशाच्या ५० टक्के प्रवेश हे मुलींसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती संतपीठाच्या संचालिका प्रा. स्वाती मुळे यांनी दिली.
 
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ उभारण्यात आले आहे. त्याअंतर्गत नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनीअर केजी अशा तीन वर्गांसाठी प्रत्येक ४० जागा याप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. त्याअंतर्गत २११ अर्जांचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी १५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी १२० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.
प्रा. स्वाती मुळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या पालकांनी दि.२२ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता संतपीठ येथे उपस्थित रहावे. याठिकाणी लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. केंद्रीय माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन – सीबीएसई) अभ्यासक्रमाला मराठी सांस्कृतिक तसेच अध्यात्मिक परंपरेचा मुख्य प्रवाह असणा-या भागवतधर्मी संतविचाराची जोड देत जबाबदार नागरिक निर्माण करणारे मूल्याधिष्ठित जीवनशिक्षण प्रदान करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलावहिला प्रयोग आहे. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमाची खास शाळा टाळगाव-चिखली येथे उभारलेल्या नवीन इमारतीमध्ये सुरु करण्यात येत आहे.
 
अल्पावधीत प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठातील प्रवेश प्रक्रियेला येत्या १४ जुलै रोजी प्रारंभ झाला. तत्पूर्वी ७ जुलै रोजी संतपीठाची घोषणा करण्यात आली होती. प्रवेशासाठी शुल्क आकारणीवरुन राजकीय व्यक्तींनी आक्षेप घेतला होता. मात्र, अवघ्या ८ ते १० दिवसांत संतीपीठाचे प्रवेश ‘हाऊसफुल्ल’ झाले. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून अध्यात्म, संतविचार आणि आधुनिक शिक्षण प्रणालीची सांगड घालत संतपीठाचा पहिला अभ्यासक्रम सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक क्षेत्रात हा मानाचा तुरा म्हणून इतिहासात नोंद होईल, असा विश्वासही प्रा. स्वाती मुळे यांनी व्यक्त केला आहे.