मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (09:46 IST)

शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै होणार

exam
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने घेण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्याबरोबरच परिषदेकडून विद्यार्थी व शाळांना नोंदणी अर्ज करण्यासाठी 23 ते 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 
राज्य सरकारकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ही 20 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित झाले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 
 
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थ्यांकडून जानेवारीमध्येच नोंदणी करून घेण्यात आली होती. 25 जानेवारीपर्यंत झालेल्या नोंदणीमध्ये 7 लाख 9 हजार 847 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 10 हजार 567, तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 99 हजार 280 इतकी आहे. 25 जानेवारी रोजी बंद झालेल्या नोंदणीवेळी पाचवी व आठवीच्या 6717 विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने अर्ज प्रलंबित होते. राज्य परीक्षा परिषदेकडून नाव नोंदणी करण्यास 23 ते 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
 
यामुळे त्यावेळी शुल्क न भरल्याने प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज निश्चित करण्याची संधी मिळाली आहे. तसेच वाढीव मुदतीमध्ये अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना 2 मेपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुभा दिली आहे. दरम्यान, 30 एप्रिलनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज किंवा 2 मेनंतर शुल्क भरता येणार नाही. अर्ज नोंदणीसंदर्भात राज्य परीक्षा परिषदेकडून www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळांवर सविस्तर माहिती उपलब्ध असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.