1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Senior journalist and social activist Pratap Asbe passes away

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रताप आसबे यांचे निधन

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे अभ्यासू विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आणि कामगार चळवळीतील खंदे कार्यकर्ते प्रताप आसबे यांचे अल्पशा आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील निर्भीड आणि अभ्यासू पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
सामाजिक चळवळीतून पत्रकारितेत योगदान
प्रताप आसबे यांनी पत्रकारितेत प्रवेश करण्यापूर्वी सामाजिक आणि कामगार चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनादरम्यान त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. 'युवक क्रांती दल' आणि 'गिरणी कामगार सभा'चे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी कामगार तसेच असंघटित शेतमजुरांच्या हक्कांसाठी मोठा संघर्ष केला.
 
त्यानंतर त्यांनी विविध प्रमुख दैनिकांमधून प्रदीर्घ काळ पत्रकारिता केली. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, सामाजिक प्रश्नांची जाण आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या लेखनाची मुख्य वैशिष्ट्ये होती. राजकारण आणि समाजकारणाचा संबंध स्पष्ट करताना त्यांनी नेहमी सामान्य माणसांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवले.
 
प्रमुख नेत्यांकडून श्रद्धांजली
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री): "महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटाचा सखोल अभ्यास असणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून, आसबे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे."
 
सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री): "राजकीय व सामाजिक घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या जाण्याने अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे."
 
शरद पवार (ज्येष्ठ नेते): "अभ्यासपूर्ण विश्लेषणातून त्यांनी पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले. सामाजिक विषयांवर चर्चा करताना आसबे हे स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मते मांडत असत."
पुढील लेख
'आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला जाऊ नका' — शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान