मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (14:40 IST)

आधाराश्रमातील विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारा वासनांध हर्षल मोरेवर बलात्काराचा सातवा गुन्हा दाखल

gang rape
नाशिक  – राज्यभरात सध्या गाजत असलेल्या आधाराश्रमातील विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. ती म्हणजे, ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमाचा संचालक हर्षल मोरे याच्यावर बलात्काराचा सातवा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी सहा मुलींनी लैंगिक शोषणाची तक्रार दिली आहे. त्यानंतर आता सातव्या मुलीनेही तक्रार दिल्याने वासनांध मोरेवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व मुली अल्पवयीन आहेत.
 
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ परिसरात द किंग फाउंडेशन संस्थेचा ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रम आहे. या आधाराश्रमात खासकरुन आदिवासी मुली निवासी स्वरुपात राहतात. येथील तब्बल ६ मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. आधाराश्रमाचा संचालक संशयित हर्षल मोरे हा सध्या पोलिसांच्या तावडीत आहे. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर राज्यभरातच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांकडून मोरेचा कसून तपास सुरू आहे.
 
त्याचबरोबर आधाराश्रमातील अल्पवयीन विद्यार्थिनींचे समुपदेशन सध्या केले जात आहे. त्याआधारेच सहा मुलींनी लैंगिक शोषणाची माहिती दिली आहे. त्यानुसार, मोरेवर पोक्सो कायद्यान्वये सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अत्याचार, पॉक्सो, व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मोरेला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आता त्याला ६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करीत असून त्यातच त्याने आणखी एक गुन्हा कबूल केला आहे. अल्पवयीन मुलींना पोर्न व्हिडिओ दाखविणे, धमकावणे या माध्यमातून तो या मुलींवर अत्याचार करीत होता. यापूर्वी सहा मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे कारनामे उघड झाले. पण आता त्याने आणखी एका मुलीशी तीनवेळा लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आधाराश्रमातील एकूण सात मुलींचे त्याने लैंगिक शोषण केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानुसार आता त्याच्या विरोधात म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये अत्याचाराचा सातवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मोरेने या गंभीर गुन्ह्यात तपासात अद्याप फारसे सहकार्य केलेले नाही. आता ६ डिसेंबरपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची आणखी कसून चौकशी होणार असून अन्य धक्कादायक बाबी समोर येण्याची चिन्हे आहेत. हे प्रकरण गंभीर असल्याने त्याची सखोल चौकशी करावी. त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यानुसार चौकशी समिती तपास करीत आहे. मात्र, दिवसागणिक गुन्हे वाढत असल्याने या समितीचा अहवाल सादर करण्यासही विलंब होणार आहे.
 
दरम्यान, याप्रकरणातील पीडित सहा अल्पवयीन मुलींना शासकीय मुलींच्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे. तसेच अन्य सात मुलींना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. म्हसरूळ परिसरात एका रो हाऊसमध्ये भाडेतत्त्वावर हा आधारश्रम चालविला जात होता. हा गंभीर गुन्हा उघडकीस येताच पोलिसांनी आधाराश्रमाला कुलूप लावले आहे. आधाराश्रमातील सर्वच मुलींचे समुपदेशन केले जात आहे. त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor