गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 30 जून 2022 (23:26 IST)

शरद पवार : फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आनंदाने घेतली नाही, त्यांचा चेहरा सांगत होता

"मुख्यमंत्री होते, पाच वर्षं त्यांनी काम केलं, विरोधी पक्षाचं नेतृत्व केलं त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे आश्चर्यजनक आहे. दोन्ही गोष्टी कोणालाच माहिती नव्हत्या," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या सगळ्या राजकीय नाट्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
 
'हिंदुहृदय सम्राट आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेत आहे....' असं म्हणत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदेंसोबतच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
आज राजभवनावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. राजभवनावर राज्यपालांशी भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली.
 
मी स्वतः मंत्रिमंडळात नसेन, बाहेरून एकनाथ शिंदेंना पाठिंबा देईल असंही देवेंद्र यांनी म्हटलं होतं.
 
पण नंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने असा निर्णय घेतला आहे की भाजपने सरकारचा भाग व्हावं. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आहे की देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं असं ट्वीट केलं.
 
पाठोपाठ भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून त्यांचा त्याग आणि निष्ठा दिसून येते असं अमित शाह यांनी ट्वीट केलं आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
या घडामोडींबद्दल बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, की उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र यांनी फार आनंदाने स्वीकारली नाही. त्य़ांचा चेहराच सांगत होता. पण एकदा मुख्यमंत्रिपदावर गेल्यानंतर इतर पदं स्वीकारण्याची उदाहरणं महाराष्ट्रात होती. शंकरराव चव्हाण माझ्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो.अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते आणि नंतर ते मंत्री होते.
 
शरद पवार यांनी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदनही केलं.
 
त्यांनी म्हटलं, "योगायोग असा आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सातारचे होते. मी मुख्यमंत्री झालो. माझं गाव सातारा जिल्ह्यातले होते. बाबासाहेब भोसले साताऱ्यातले होते. पृथ्वीराज चव्हाण तिथले होते. त्यामुळे साताऱ्याला लॉटरी लागली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एकदा मुख्यमंत्री झाला की तो राज्याचा प्रमुख होतो. मी त्यांना शुभेच्छा देतो."
 
शिवसेना संपुष्टात आली नाहीये
ज्यावेळी 39 लोकं राज्याच्या बाहेर जातात आणि त्यांची मतं वेगळी असतात त्यावेळी दुरुस्त करायला काही स्कोप रहात नाही, असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे आणि बाकी आमदारांचं बंड मिटवणं हे कठीणच होतं, याची अप्रत्यक्ष कबुलीही दिली.
 
राष्ट्रवादीचा या बंडाशी काहीही संबंध नाही. एकदा बहुमत नसेल तर सगळं ग्रेसफुली राजीनामा दिला. हे माझ्यादृष्टीने चांगली गोष्ट आहे, असंही त्यांनी म्हटलं.
 
माझ्या मते शिवसेना संपुष्टात आली नाही, उतार चढाव होतात, बंड होतात. ज्यांनी बंड केलं ते पराभूत झाले, संघटना अशी संपत नाही, हे सांगताना शरद पवार यांनी स्वतःचं उदाहण दिलं. शरद पवार यांनी म्हटलं, "1980 साली माझ्या नेतृत्वाखाली 67 आमदार निवजून आले. सहा महिन्यांनी मी भारताच्या बाहेर गेलो. दहा दिवसांत फक्त सहा लोक शिल्लक राहिले. त्यानंतर निवडणूक झाली. मला जे सोडून गेले त्यांचा पराभव झाला."
 
त्याचवेळी शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.