शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:49 IST)

निवडणूकीची तयारी करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या

Sharad Pawar gave instructions to prepare for the elections Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
राज्यात 2022 साली होणार्‍या तब्बल 18 महापालिका, 27 जिल्हा परिषद आणि 200 च्या घरात नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने  सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.
 
शक्य असेल तिथे एकट्याने निवडणूक लढवायची,गरज असेल तिथे मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याच्या सूचनाही शरद पवार यांनी दिल्या आहेत.काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
 
प्रत्येक ठिकाणच्या राजकीय परिस्थितीनुसार आघाडी की स्वबळ याचा निर्णय घेतला जाणार आहे.शरद पवारांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली.या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल,राष्ट्रवादीचे सर्व मंत्री,राज्यमंत्री आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते.
 
बैठकीत मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.पालकमंत्री, संपर्कमंत्री यांच्याकडे ज्या जिल्ह्याची जबाबदारी आहे त्याबाबतही चर्चा या बैठकीत झाली. निवडणूक तयारीसाठी प्रत्येक नेत्याला एक जिल्हा देण्यात आला आहे. तसंच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नये ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.