मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (09:21 IST)

'या' जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखायला शरद पवार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा विळखा आटोक्यात आणण्यासाठी थेट पुढाकार घेतला आहे. पुणे शहरासाठी सहा कार्डियाक ॲम्बुलन्स आणि दीडशे रेमडिसिव्हर इंजेक्शन दिले असून गरजवंतांना त्याचे वाटप करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना दिले आहेत.
 
जम्बो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस कार्डियाक ॲम्बुलन्स वेळेत उपलब्ध न होणे हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पुणे शहरासाठी सहा कार्डियाक ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पवार यांनी धुरा आपल्या हाती घेत बैठका, भेटींचा सपाटा लावला आहे. पवार यांनी अचानक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला भेट देत तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यापाठोपाठ विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत त्यांनी पुणे पिंपरी आणि जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
 
पवार यांनी रायकर यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व परिस्थितीची माहिती घेतली. शहरातील सध्या कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या, गंभीर रुग्णांचे प्रमाण, त्यांच्यावर होत असलेले उपचार, संभाव्य रुग्णसंख्या आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, याबाबत शहरातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. पुणे शहरात केवळ तीनच कार्डियाक ॲम्बुलन्स असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. या पार्श्वभूमीवर पवार यांनी तातडीने सहा ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या. तसेच आर्थिक परिस्थिती नसलेल्या गरजवंतांना रेमडिसिव्हर इंजेक्शनची आवश्यकता भासल्यास त्यांना ते मोफत मिळावे, यासाठी दीडशे इंजेक्शनही तातडीने उपलब्ध करून दिलेत. इंजेक्शन तसेच कार्डियाक ॲम्बुलन्सचे व्यवस्थापन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी करावे, त्यासाठी एक हेल्पलाइन सुरू करावी, अशा सूचनाही त्यांनी स्थानिक नेत्यांना केल्या.
 
पवार यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित आयोजित केली आहे. या बैठकीसाठी काही लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष तर काही लोकप्रतिनिधी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.