शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (18:41 IST)

राज ठाकरेंच्या टीकेमुळे शरद पवार दगडूशेठ मंदिर परिसरात गेले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले होते. पण त्यांनी मंदिरात जाणं टाळलं. त्यांनी बाहेरूनच गणपतीचं दर्शन घेतलं.
 
"दगडूशेठ मंदिराला अतिरिक्त जागेची अवश्यकता आहे. त्या जागेच्या पाहाणीसाठी शरद पवार आले होते. शरद पवार यांच्या पायाला बँडेज असल्याने त्यांना सँडल काढून आत जाणं शक्य नव्हतं. तसंच त्यांनी आज मांसाहार केला होता त्यामुळे त्यांनी मंदिरात जाणं टाळलं," असं पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.
 
शरद पवार यांच्या बरोबर गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलसुद्धा उपस्थित होते.
 
"मंदिराच्या शेजारी असलेला शासकीय प्लॉट मिळावा अशी विनंती आम्ही शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं. ते त्यांनी लगेचच स्वीकारलं आणि त्यानंतर लगेचच ते त्याच्या पाहाणीसाठी गृहमंत्र्यांना घेऊन आले होते. भक्तांची सुविधा व्हावी यासाठी आम्हाला जागेची कमतरता आहे," असं दगडूशेट गणपतीचे विश्वस्तांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं आहे.
 
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादी असल्याचा आरोप केला होता. तसंच ते नास्तिक आहेत असंही राज ठाकरे म्हणाले होते.
 
त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये पवारांनी ब्राम्हण संघटनांसोबत बैठक घेतली होती. त्यामुळे मग याच घटनाक्रमाचा भाग म्हणून शरद पवारांवर मंदिरात जाण्याची वेळ आली का किंवा त्यांच्या प्रचाराच्या सुरुवातीची आठवण करून द्यावी लागली होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आधी जाणून घेऊया.
 
राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत लाऊडस्पीकरच्या मुद्द्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
 
शरद पवार यांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
 
राज ठाकरे यावेळी म्हणाले, "शरद पवार जातीत जे भेद निर्माण करत आहेत, त्यातून भेद निर्माण होतोय. ते हातात पुस्तक घेऊन त्यावर लेखकाचं नाव बघून प्रतिक्रिया देतात. मी बोलल्यानंतर आता शिवाजी महाराजांचं नाव घेत आहेत. काहीतरी व्हीडिओ काढलाय, तल्लीन झालाय. गीतरामायण ऐकत आहेत. बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवत आहे. कशाला खोटं करता?
 
"मी म्हटलं पवार नास्तिक आहे त्यानंतर ते देवाचे फोटो काढायला लागले. कशाला फोटो काढता. तुमची कन्या लोकसभेत म्हणाली माझी वडील नास्तिक आहेत."
 
राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
राज ठाकरे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे देवासमोरील अनेक फोटो सोशल मीडियातून शेअर केले होते.
 
शरद पवार हे नास्तिक असल्यामुळे त्यांना हिंदू धर्माविषयी आस्था नाही, या राज ठाकरे यांच्या वक्तव्याची भाजपकडून री ओढण्यात आली होती.
 
महाराष्ट्र भाजपच्या (BJP) ट्विटर हँडलवरून शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणाचा व्हीडिओ ट्वीट करण्यात आला होता.
 
त्यात लिहिलं होतं, "पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवारसाहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!"
 
भाजपच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
 
भाजपच्या या टीकेला उत्तर देताना भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं. राष्ट्रवादीकडून एक ट्वीट करण्यात आलं.
 
त्यामध्ये म्हटलं की, "झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हीडिओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हीडिओ दाखवण्याची अर्धांश हिंमत तरी ठेवायची होती."
 
जवाहर राठोड यांची कविता म्हणजे कष्टकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. हीच कविता त्यांनी साताऱ्यातील भाषणात वाचून दाखवली होती.
 
त्यावेळी पवार म्हणाले होते की, "ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि त्या मंदिरात आम्हाला येऊ देत नाहीत. हा तुमचा देव आम्ही आमच्या छिन्नीने बनवला. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय आम्ही सहन करणार नाही."
 
राज ठाकरेंमुळे शरद पवारांवर मंदिरात जाण्याची वेळ?
गेल्या काही दिवसांमधील या घडामोडींनंतर शरद पवार शुक्रवारी दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी गेले. त्यांच्यावर मंदिरात जाण्याची वेळ राज ठाकरे यांच्यामुळे आली का, असा सवाल उपस्थित होत आहे.
 
याविषयी विचारल्यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "शरद पवार यापूर्वीसुद्धा निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी मंदिरात जाऊन नारळ वाढवायचे. परंतु आपल्या धार्मिक भावनांचे जाहीर प्रदर्शन करण्याची गरज कदाचित त्यांना पूर्वी वाटत नसावी.
 
"अलीकडच्या काळात जे धर्माचं आणि बहुसंख्यांकांचं राजकारण सुरू झालं आहे, त्यामुळे कदाचित आपल्या धार्मिक भावना राजकीय व्यासपीठावर व्यक्त करण्याची गरज अनेकांना वाटायला लागली आहे. कदाचित हा त्याचाच परिपाक असावा. राज ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर ते अधिक ठळकपणे समोर आणले जात असेल."
 
ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांना मात्र राज ठाकरेंच्या टीकेमुळे शरद पवारांवर मंदिरात जाण्याची वेळ आली, असं वाटत नाही.
 
ते सांगतात, "शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी विठ्ठलाची शासकीय पूजा केली आहे. निवडणूक काळात काटेवाडीमधील मारुती मंदिर असो किंवा बारामती येथील राम मंदिर इथूनच प्रचाराची सुरुवात व्हायची. त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा 2009 ला तुळजापूरच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. पवार हे रूढार्थाने धार्मिक किंवा श्रद्धाळू नेते नाहीत मात्र त्यांना देवदर्शन वर्ज्य नाही."
 
ते पुढे सांगतात, "मात्र पवार चाणाक्ष आहेत. अशी टीका होणार याचा त्यांना अंदाज आला त्यामुळं दगडूशेठ मंदिराच्या समोरच असलेल्या भिडे वाडा (जिथून पहिली मुलींची शाळा फुले दाम्पत्याने सुरू केली. जी इमारत जीर्ण अवस्थेत आहे आणि कोर्टात हे प्रकरण सुरू आहे ) इथं त्यांनी भेट दिली. त्यामुळं होणारी टीका बोथट करण्याची ही खबरदारी त्यांनी घेतल्याचं दिसतंय."
 
याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यावर भाष्य करताना म्हणतात, "शरद पवार यांचा गेल्या 55 वर्षांतील प्रचार हा काटेवाडीमधील मारूती मंदिरात नारळ फोडून होत आला आहे. पण, त्यांनी या गोष्टीचा प्रचार प्रसार कधी केला नाही. शरद पवारांनी अष्टविनायक महामार्ग बांधला, अनेक गावांमधील मंदिरांना सभामंडप दिले. त्यामुळे राज ठाकरेंच्या टीकेमुळे शरद पवारांवर मंदिरात जाण्याची वेळ आली, असं आम्हाला वाटत नाही."