सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2023 (23:23 IST)

शरद पवार म्हणतात, 'आम्ही भाजपाबरोबर जाण्यासाठी मतं मागितली नव्हती'

sharad pawar
कर्जतमधील चिंतन शिबिरातील अजित पवारांच्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार यांनी केलेल्या आरोपांपैकी बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा ऐकल्या, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
 
कर्जतमधील चिंतन शिबिरात अजित पवार यांनी शरद पवार पवार यांच्यावर एकहाती सत्ता चालवल्याचा आरोप केला होता. पक्षातील अनेक निर्णय आम्हाला विचारात न घेतल्याचं अजित पवार म्हणाले होते.
 
त्यावर शरद पवार म्हणाले, “पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडून सगळ्यांशी सुसंवाद ठेवला गेला आहे. नेत्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्याविषयी कधी चर्चा झाली नाही, असं नाही. पण ते ज्या मार्गाने जाण्याची भूमिका मांडत होते. ते आपल्या विचारांशी सुसंगत नव्हते.”
 
शरद पवार शनिवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
आम्ही लोकांकडून जी मते मागितली होती. ती भाजपसोबत जाण्यासाठी मागितली नव्हती. उलट आम्ही त्यांच्याविरोधात भूमिका मांडली आहे. त्यामुळे आम्ही भाजपसोबत गेलो असतो तर लोकांची फसवणूक झाली असती असंही पवार म्हणाले.
याआधी शनिवारी (2 डिसेंबर) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. त्यावेळी पण शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता टीका केली.
 
“जे काही घडलं त्याची चिंता करण्याचं कारण नाही. उलट त्यामुळे संघटना अधिक स्वच्छ झाली. नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे”, असं पवार म्हणाले.
 
आतापर्यंत सामान्य लोकांचा पाठिंबा मिळवण्यात जे यशस्वी झाले त्यांच्यासोबतच लोक राहिले आहेत. तशीच गोष्ट महाराष्ट्रात येत्या काळात पाहायला मिळेल, असंही पवार म्हणाले.
 
पण याआधी शरद पवार स्वत: भाजपसोबत जायला तयार होते. त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता.
 
या वर्षीच्या सुरुवातीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सरकारमध्ये जाण्यासाठी हालचाली सुरु केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारां यांना 'मी 1 मे ला राजीनामा देतो आणि तुम्ही सरकारमध्ये जा,' असं सांगितल्याचं अजित पवार म्हणाले .
 
अजित पवार यांच्या या टीकेला शरद पवार यांनी थेट उत्तर द्यायला टाळलं. पण अजित पवार आणि इतर नेते पक्ष सोडून गेल्याने फार फरक पडणार नाही, असं ते म्हणाले
 
“युवकांची संघटना मजबूत केली तर येणाऱ्या निवडणुकीत याच संघटनेतील युवक मोठ्या प्रमाणात निवडून येतील. प्रत्येक गावात जायला पाहिजे. आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. हे काम चिकाटीने केलं पाहिजे,” असं पवारांनी म्हटलं.
 
कर्जतच्या भाषणातून अजित पवार यांनीही शरद पवार यांच्यावर आरोप करत पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळेच आपण भाजपसोबत गेल्याचं अजित पवार म्हणाले. त्यावरून त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
 
शरद पवार यांनी मात्र याकडे लक्ष देऊ नका असं म्हटलं. आपल्याकडून पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचं शरद पवार म्हणाले.
“काही लोकांनी माझ्यावर टीका केली. ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी पक्ष घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून आपल्यावर टीका होतेय. त्याचा फारसा विचार करण्याचं काही कारण नाही. ते असं करत आहेत. कारण लोकांमध्ये गेल्यावर ते अनेक प्रश्न विचारू शकतात. पण त्यापासून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी असं केलं जात आहे,” असं पवार म्हणाले.
 
ते पुढं म्हणाले, “सत्ता येते आणि जाते. सत्ता गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा नवीन उर्मीने लोकांकडे जाता येतं. पण जे लोक सत्तेसाठी दुसरीकडे जातात, त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत नाही."
 
“लोक पाहतात की तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि आता कुणासोबत आहात. याविषयी सामान्य लोक विचार करतात. त्यामुळेच परिवर्तनाची धमक लोकांकडे असते. "
 
लोकसभेची निवडणूक येत्या तीन-चार महिन्यावर आलीये. त्यानंतर विधानसभा निवडणूक होईल. म्हणून आपण प्रत्येक मतदार संघाची आखणी करायला पाहिजे. त्याप्रमाणे पुढची पावले टाकायला पाहिजेत, असं पवार म्हणाले.
 
या दरम्यान शरद पवार यांनी अजित पवार आणि त्याच्या गटातील नेत्यांना संधीसाधू म्हटलं.
 
"आम्ही विचारांशी प्रामाणिक आहोत आणि आम्ही संधीसाधू नाहीयेत. विधानसभा निवडणूका जाहीर होतील तेव्हा राष्ट्रवादीची नवीन फळी तयार होईल, असेही सुतोवाच पवारांनी दिले आहेत.
 
Published By- Priya Dixit