शरद पवार हसून एकच वाक्य बोलले, ते म्हणजे…”, रोहित पवारांचा खुलासा
Sharad Pawar अजित पवारांच्या शपथविधीबाबत माहिती देताना रोहित पवार म्हणाले, “शपथविधीच्या आधी अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक आमदार उपस्थित होते. त्यांना सांगण्यात आलं होतं की, ६ जुलैला शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष निवडण्याबाबत जी बैठक बोलावली आहे, त्या बैठकीच्या आधी आमदारांचं मतही जाणून घ्यावं, असं शरद पवारांचं मत आहे. त्यामुळे आपण बैठक घेत आहोत, असं आमदारांना सांगण्यात आलं होतं.”
“दिशाभूल म्हणा किंवा जे काही सांगून असेल, पण तिथे आमदार गेल्यानंतर त्यांच्या सह्या घेतल्या. कागदपत्रावरील भाग वाचू दिला नाही, फक्त सह्या करा, एवढंच सांगितलं. तेव्हा काही लोकांना अंदाज आला. त्यांनी शरद पवारांना फोन केले. तुम्ही बघितलं असेल सह्या करायला कदाचित ४० आमदार असतील, पण शपथविधीला ४० आमदार नव्हते. मधूनच काही आमदार निघून आले होते” असं रोहित पवारांनी नमूद केलं.
“लोकांचे जेव्हा फोन यायला लागले, तेव्हा अंदाज आला की काहीतरी मोठं घडणार आहे. आम्ही टीव्हीवर हे सगळं बघतच होतो. टीव्हीवर सगळं बघत असताना शरद पवारांच्या चेहऱ्यावर कुठेही टेन्शन दिसत नव्हतं. तसं बघितलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे. पण पवारसाहेबांचा एकंदरीत अनुभव आणि त्यांनी आपल्या आयुष्यात बघितलेले चढ-उतार पाहता. त्यांच्या चेहऱ्यावर कुठंही टेन्शन दिसत नव्हतं. ते अक्षरश: शांत बसले होते. शेवटी हसत-हसत एवढंच म्हणाले, आता लोकांमध्ये जायचंय आणि लढायचं. मग त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली,” असा घटनाक्रम रोहित पवारांनी सांगितला आहे. ते मुंबई तकशी बोलत होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor