शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2023 (21:07 IST)

शरद पवार : महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबतच्या वक्तव्याचा अर्थ काय?

मानसी देशपांडे
“आमची महाआघाडी आहेच. एकत्र काम करण्याची इच्छाही आहे. पण इच्छा असणं पुरेसं नसतं. जागांचं वाटप, त्यातले काही इश्यू आहेत की नाही, हे अजून केलंच नाही तर कसं सांगता येईल.”
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडलं. राज्यात आधीच राजकीय अस्थिरता निर्माण होते की काय, अशी स्थिती असताना पवारांनी केलेल्या वक्तव्यानं आणखी एक मुद्दा समोर आणला.
 
शरद पवार यांच्या नेमक्या कुठल्या विधानांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवलीय, हे आपण आधी पाहू. त्यानंतर राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांचं त्यावरील मत जाणून घेऊ.
 
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
अमरावतीमध्ये शरद पवार पत्रकारांसोबत संवाद साधत होते. त्यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला की, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णायानंतर जर 16 आमदार अपात्र झाले, तर अजित पवारांना फोडण्याची चर्चा आहे.”
 
यावर उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटलं की, “उद्या कुणी फोडायचं काम करत असेल, तर त्यांची जी स्ट्रॅटेजी असेल तसे कार्यक्रम ते घेत असतील. आम्हाला जी भूमिका घ्यायची ती भक्कमपणे भूमिका घ्यावी लागेल. ते आज सांगणं योग्य नाही. कारण आम्ही यावर चर्चाच केली नाही.”
 
तसंच, 2024 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष ‘महाविकास आघाडी’ म्हणून सोबत लढतील का, असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, “वंचित आघाडीशी आमची चर्चा झाली नाही. ती फक्त कर्नाटकाविषयी झाली. बाकी एकत्र लढणार की नाही तर... आघाडी आहे.. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा असणं पुरेसं नसतं. जागांचं वाटप, त्यातले काही इश्यू आहेत की नाही, हे अजून केलंच नाही तर कसं सांगता येईल.”
 
याआधी राष्ट्रवादी फुटण्याच्या शक्यत्यावर पुणे जिल्ह्यातील सासवड मध्ये बोलताना शरद पवार यांनी हा कल्पनाविलास असल्याचं म्हटलं होतं.
 
“हे सगळं तुमच्याच (प्रसारमाध्यमांच्या) मनात आहे. बाकी कुणाच्या नाही,” असं शरद पवार म्हणाले होते.
 
यावेळी मात्र बोलताना त्यांनी पक्ष फोडण्याच्या कारवायांविषयी आम्हाला भक्कमपणे भूमिका घ्यावी लागेल असं वक्तव्य केलं होतं.
 
‘शरद पवारांची वेट अँड वॉच अशी भूमिका’
 
शरद पवारांच्या विधानांवरुन सध्या ते आणि सगळेच राजकीय पक्ष ‘वेट एँड वाँच’च्या भूमिकेत असल्याचं चित्र दिसतंय, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं.
 
अभय देशपांडे म्हणले की, “शरद पवारांनी हे आधीच स्पष्ट केलंय की, पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेणार नाही. ज्याला जायचंय त्याने जा. अजित पवारांपासून सगळ्यांसाठीच त्यांनी तो इशारा दिलेला आहे की आम्ही पार्टी म्हणून भाजप सोबत जाणार नाही.
 
“दुसरा विषय राहिला म्हणजे जागावाटप. तर जागावाटपाविषयी आत्ताच कुणी काही बोलणार नाही. कारण यामध्ये बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल कसा लागणार, लोकसभेच्या आधी मुंबई पालिकेच्या निवडणुका झाल्या तर शिवसेनेचं स्टेटस काय असणार, मुंबई पालिका ताब्यातून गेली तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टेटस काय असेल, या सगळ्या गोष्टी जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वपूर्ण ठरतील.”
 
सुप्रीम कोर्टाचा निर्णय जाहीर होणे आणि निवडणुका तोंडावर आल्यावर परस्थितीनुसार निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
अभय देशपांडे म्हणाले की, ““महाविकास आघाडी म्हणून जरी एकत्र लढायचं ठरलं, तरीही त्या त्या वेळची परिस्थिती बघून तसं ठरवलं जाईल. विधानसभेबद्दल बोलायचं म्हटलं तर या निवडणुका जर ठरलेल्या वेळेवर झाल्या तर लोकसभेच्या निकालाचा त्यांच्यावर परिणाम होईल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येतो यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. त्यामुळे पवार आता कुठल्याही लाँग टर्म कमिटमेंट करणार नाहीत. त्यावेळच्या परिस्थितीवर निर्णय घेतील.
 
“जागावाटप हा मुद्दा आहेच. काँग्रेसचे काही नेते म्हणतात की पालिका स्वतंत्र लढणार. काही म्हणतात की एकत्र लढणार. त्यामुळे सगळे पक्ष निवडणुका येईपर्यंत आपापले प्रर्याय उघडे ठेऊन काम करत राहतील असं दिसतंय. आत्ताच आघाडी होणार म्हटलं तर शिवसेनेने ज्या मतदारसंघांमधून जिंकली आणि जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार थोड्या मतांनी हारले तर ते काय करणार? ते त्यांचे पर्याय शोधू लागतील.”
 
‘संदिग्धता निर्माण करणं – ही पवारांची स्ट्रॅटेजी असू शकते’
लोकमत वृत्तसमूहाचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्या मते, “तीन पक्षांमध्ये जागांचं वाटप हा कळीचा मुद्दा आहेच. पण जर महाविकास आघाडी एकत्र लढली नाही तर भाजप शिंदेंसोबत लढतील का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो.”
 
संदीप प्रधान पुढे म्हणतात की, “तीन पक्षांचं जागावाटप हे एक आव्हानच आहेत. महाविकास आघाडी वेगवेगळी लढली तर कदाचित भाजप आणि शिंदेंची पण युती होईल की नाही याविषयी शंका आहे. तसं जर झालं तर शिंदेच्या सोबत गेलेल्या आमदारांच्यामध्येही अस्वस्थता किंवा भीती निर्माण होऊ शकते. कारण महाविकास आघाडी जर एकत्र लढणार नसेल तर भाजपनेच का आपल्या जागा सोडायच्या अशा प्रश्न निर्माण होईल. असं वाटणारे भाजपचं जे नेते आहेत, त्यांना बळ मिळू शकतं. 240 जागा आपणच लढवणार असं विधान भाजपकडून आले होते. त्यामुळे संदिग्धता निर्माण करणे ही पवारांची स्ट्रॅटेजी असू शकते.”
 
राष्ट्रवादी फोडण्याची शक्यता आणि वातावरणनिर्मीती थांबवण्यासाठीही पवारांनी महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवण्याबद्दल अनिश्चितता निर्माण करणारे विधान पवारांनी केलं असेल, असं संदीप प्रधान यांना वाटतं.
 
संदीप प्रधान म्हणतात की, “महाविकास आघाडी एकत्र राहिली तर भाजप-शिंदे गटासमोर आव्हान उभं राहील, याची जाणीव भाजपला झालेली आहे. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीतलं कुणी फुटतंय का, याचा भाजप प्रयत्न करतंय किंवा फुटण्याची शक्यता आहे, अशी वातावरण निर्मीती केली जातेय. ही वातावरण निर्मीती थांबवायची असेल तर त्यावर एकच उपाय आहे, की महाविकास आघाडी होणार आहे की नाही याविषयी संदिग्धता निर्माण करायची. जेणेकरुन भाजप त्वेषाने महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न करणार नाही.
 
“ही पवारांची स्ट्रटेजीही असू शकते की, अशी विधानं करायची की एकत्र निवडणुका लढवणार की नाही याविषयी चर्चा झाली नाही. त्यामुळे समोरुन होणारा जो अटॅक आहे तो थोडासा कमी होऊ शकतो. ही एक शक्यता आहे.”
 
‘सगळ्याच पक्षांसाठी जागांची अॅडजस्टमेंट अपरिहार्य’
ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी म्हणतात की, “शरद पवार म्हणाले तसं जागावाटपाची चर्चा अजून झाली नसली तरीही सद्यस्थितीत महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना कुणीतरी मित्र शोधूनच निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.”
 
राही भिडे पुढे म्हणतात की, “2014 मध्ये राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यांना कोणताही पक्ष अस्पृश्य राहिलेला नाही. पण आता शरद पवार पक्ष म्हणून भूमिका मांडत आहेत. तसं असेल तर मग महाविकास आघाडीमध्ये जागांची अॅडजस्टमेंट करावीच लागेल.
 
“कोणताही पक्ष स्वतंत्र लढण्याच्यापरिस्थितीमध्ये नाही. भाजप तिकडे अॅग्रिसेव्हली कँपेन करतंय. पक्ष वाढीसाठी भाजप सगळी रणनिती वापरतंय. एकनाथ शिंदेंचेही पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पण स्वतंत्रपणे लढण्याची क्षमता त्यांची पण नाहीये. साम-दाम-दंड-भेद या नितीने भाजप प्रयत्न करतोय. पण त्यांनाही एकनाथ शिंदेंची गरज भासलेली आहे. त्यामुळे कुणी जर स्वबळावर लढतो म्हणत असेल आणि अशा वल्गना करत असेल तर त्याला काही अर्थ नाही,” असंही राही भिडे म्हणाल्या.
 
पवारांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्या?
महाविकास आघाडीबद्दलच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची म्हणाले की, “शरद पवार मोठे नेते आहेत. ते जेव्हा वक्तव्य करतात, तेव्हा त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं गांभीर्य असतं. एवढंच या प्रसंगी मी सांगू शकतो.”
 
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले की, “मला अजिबात असं वाटत नाही की, महाविकास आघाडी संदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल. कारण सातत्याने आम्ही सगळेच चर्चा करत असतो. थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोललो. त्यांच्या बोलण्यातून महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं त्यांना वाटतं असं जाणवत नाही.”
 
दरम्यान, महाविकास आघाडीच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं नंतर शरद पवारांनी म्हटलंय.
Published By -Smita Joshi