1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (18:07 IST)

शरद पवार : 'राजीनामा मागे घेतोय, पण उत्तराधिकारी नेमायला हवा'

"कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे," असं शरद पवार यांनी आज (5 मे) पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं. शरद पवार पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीच्या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही."
 
उत्तराधिकारी निर्माण करण्याच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणाले की, "मी पुनश्च: अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणं आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन नेतृत्त्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील."
 
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे -
 
* जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा होती
* माझ्या निर्णयानंतर तीव्र पडसाद उमटले
* कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली
* माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही
* नवं नेतृत्त्व घडवण्यावर भर देणार
* उत्तराधिकारी निर्माण होणं आवश्यक
 
दुसरीकडे, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीबाबत घेतलेला निर्णय अध्यक्ष निवड समितीने फेटाळून लावला आहे.
 
शरद पवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावं, अशी मागणी निवड समितीने केली आहे. मात्र, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला काही वेळ द्यावा, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
 
शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव पारीत केल्यानंतर निवड समितीच्या सदस्यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली.
 
यादरम्यान आपला निर्णय निवड समिती सदस्यांनी पवारांना कळवला. यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया 'बघू' अशी होती, असं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
 
ते म्हणाले, "शरद पवार आपला निर्णय लवकरच कळवतील. कार्याध्यक्ष पदावर कोणतीही चर्चा झालेली नाही. केवळ राष्ट्रीय अध्यक्ष पदावर शरद पवारच कायम रहावे यावर चर्चा झाली."
 
"आम्ही त्यांना थोडा वेळ देणार आहोत. त्यांचा विचार झाल्यानंतर ते आम्हाला निरोप देतील," असं जयंत पाटील म्हणाले.
 
शरद पवारांचा राजीनामा फेटाळला - प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर शरद पवारांनीच राहावं, असा ठराव समितीच्या बैठकीत झाला असून आम्ही त्यांचा राजीनामा फेटाळलेला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
 
शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांचा हा निर्णय नाकारला आहे.
 
"राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून तसंच समितीतील निमंत्रक म्हणून माझं नाव असल्याने या ठरावाबाबत आपण सर्वांना माहिती देत आहोत," असं ते म्हणाले.
 
यावेळी पटेल यांनी म्हटलं, “शरद पवारांनी लोक माझा सांगाती पुस्तक प्रकाश सोहळ्यात अचानकपणे निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आम्ही अवाक झालो होतो. देश, राज्य आणि पक्षाला शरद पवारांची गरज आहे.”
 
यावेळी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला ठराव प्रफुल्ल पटेल यांनी वाचून दाखवला.
 
त्यानुसार, “राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांचा हा निर्णय एकमताने नामंजूर करण्यात आला असून त्यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावेत, अशी आमची इच्छा आहे,” असं पटेल म्हणाले.
 
बैठकीत हा ठराव केल्यानंतर आपण शरद पवारांची वेळ घेऊन त्यांची भेट घेणार आहोत. यासंदर्भात शरद पवार काय म्हणतात, ते पाहून आपण पुढील निर्णय घेणार आहोत, असं पटेल यांनी म्हटलं.
 
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सलग चौथ्या दिवशी पक्षातील घडामोडी सुरूच आहेत.
 
एकीकडे शरद पवार आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर ठाम असून दुसरीकडे त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा असा नेते-कार्यकर्त्यांचा रेटाही कायम असल्याचं दिसून येतं.
नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची आज बैठक असल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
 
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक आज (5 मे) सकाळी 11 वाजता नियोजित होती.
या बैठक सुरू होण्यास काही मिनिटांचा विलंब झाला. दरम्यान, बैठकीनंतर काही वेळेतच म्हणजेच 11 वाजून 30 मिनिटांनी अध्यक्षपद निवड समितीची एक पत्रकार परिषद होईल, अशी माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवड समितीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ, के के शर्मा, दिलिप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, फौजिया खान, धीरज शर्मा, पी सी चाको आणि सोनिया दूहन हे सदस्य आहेत.
दरम्यान, कार्यालयाबाहेर कार्यकर्तेही जमा झाले असून पोस्टरबाजी आणि घोषणाबाजीही सुरू असल्याचं दिसून येतं.
 
बैठकीकडे राज्याचं लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीसाठी सकाळी साडेदहा वाजता नेतेमंडळी दाखल होण्यास सुरुवात झाली.
 
सकाळी साडेदहाच्या सुमारास अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आदी नेते एकामागून एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पोहोचणं सुरू झालं.
विरोधी पक्षनेते अजित पवार कार्यलयात दाखल होताच बाहेर जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं.
 
कार्यालयात बैठकीसाठी दाखल होणाऱ्या प्रत्येक नेत्याला कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढत आत प्रवेश करावा लागला.
 
कार्यालयाबाहेर काय परिस्थिती?
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येतं. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात असून माध्यम प्रतिनिधींनीचीही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
 
कार्यकर्ते मोठमोठे फलक घेऊन शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी मागणी करत आहेत. तसंच जोराने घोषणाबाजीही याप्रसंगी होत असल्याचं दिसून येतं.
 
काही उत्साही कार्यकर्त्यांनी टाळ-मृदूंग घेऊन ताल धरली आहे. एकूणच येथील वातावरणात वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळत आहे.
 
एकीकडे घोषणाबाजी सुरू असताना एका कार्यकर्त्यांने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. इतर कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ त्या कार्यकर्त्याला रोखलं. यामुळे बाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं.
 
या प्रकारानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला असून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.
 
एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार – शरद पवार
अध्यक्षपद निवड समितीतील नेत्यांच्या बैठकांचं सत्र कालही (4 मे) सुरू होतं. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत यासंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीतूनही त्याबाबत तोडगा निघू शकला नव्हता.
यानंतर, शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहावं, अशी मागणी करत सभागृहाबाहेर ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार यांनी भेट घेतली.
 
यावेळी शरद पवार म्हणाले, "पक्षातल्या लोकांच्या तीव्र भावना मला दिसत आहेत. तुम्ही राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आले आहात. मी हा निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. नवं नेतृत्व तयार व्हावं यासाठी हा निर्णय घेतलाय. मला एक खात्री होती की मी तुमच्याशी चर्चा केली असती तर तुम्ही हो म्हणाला नसता."
 
"तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती. पण मी ते केलं नाही. आता देशातून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करून मग मी 1 ते 2 दिवसात निर्णय घेईल. तो घेताना कार्यकर्त्यांच्या मनातली भावना लक्षात घेईल. 2 दिवसांनंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही,” असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
 
पटेल, पाटील अध्यक्षपदासाठी अनिच्छुक
"मी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, कारण माझ्या दिल्लीत ओळखी नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं.
 
मुंबई येथे काल (4 मे) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडींविषयी माहिती दिली.
 
पाटील म्हणाले, “मी आजपर्यंत महाराष्ट्रात काम केलेलं आहे. ती सोडून मला दिल्लीतील जबाबदारी स्वीकारता येणार नाही. मी दिल्लीत काम केलेलं नाही, तिथे माझ्या ओळखीही नाहीत. अशा जबाबदाऱ्या संसदेत काही वर्षे काम केलेल्या व्यक्तीने पार पाडायच्या असतात. शरद पवारांना तो अनुभव आहे. म्हणून ते देशभर राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम करू शकले.”
 
“शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर नेते निराश झाले आहेत. नेते-कार्यकर्ते त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा याबाबत आग्रही आहेत, पण शरद पवार निवृत्ती घेण्यावर ठाम आहेत. पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावलं टाकली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
 
शरद पवार अध्यक्ष राहिले तर पक्षातील सर्व घटकांना ते न्याय देऊ शकतील, ते अध्यक्ष नसतील तर आपल्याला या पक्षात न्याय मिळेल का, अशी भावना लोकांची झाली आहे. त्यामुळे ते आम्हाला राजीनामे पाठवत आहेत, असं पाटील यांनी म्हटलं.
तर, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत अनिच्छा प्रकट केली.
 
“मी पक्षाचं अध्यक्षपद घेण्यासाठी तयार नाही, माझ्याकडे आधीपासून खूप काम आहे. माझी अध्यक्ष होण्याची इच्छा नाही,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
 
अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्तदेखील पटेल यांनी फेटाळून लावलं आहे. बैठकीचा निमंत्रक मी आहे त्यामुळे मीच अधिकृत सांगू शकतो, असंसुद्धा पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.




Published By - Priya Dixit