शिर्डी साईबाबा संस्थानने भक्तांसाठी घेतला “हा” मोठा निर्णय
साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेमध्ये उभे राहण्यापासून भक्तांची आता सुटका होणार आहे. साईबाबा संस्थानने तब्बल १०९ कोटी रुपये खर्च करून बांधलेले अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू करण्यात येणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरामधून हजारो भाविक येत असतात. त्यांना साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी तासनसात दर्शन रांगेमध्ये उभे राहावे लागते. मात्र, आता नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन रांगेमुळे भक्तांना मोठी दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक दर्शन रांग ही संपूर्ण वातानुकूलीत असून साई भक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
दरम्यान, शिर्डीमध्ये आल्यानंतर भक्तांना दर्शनपास काऊंटर, चप्पल स्टॅण्ड, लॉकर, टॉयलेट अशा अनेक गोष्टींची शोधाशोध करावी लागते. मात्र, आता एकाच छताखाली सर्वकाही सुविधा उपलब्ध असणार आहेत. या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शन रांगेमध्ये ११ हजार भाविक बसू शकतील असा वातानुकूलीत हॉल बनवण्यात आला असून जिथे भक्तांना बसता येईल आणि आल्हाददायक दर्शन कसे दिले जाईल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
साईबाबा संस्थानचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून तिरुपती बालाजीच्या देवस्थानच्या धर्तीवर त्यांच्यापेक्षा देखील सुसज्ज अशी ही दर्शनव्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन शिर्डीमध्ये ही दर्शनव्यवस्था, शैक्षणिक संकुल आणि निळवंडे धरणाचे लोकार्पण करण्याचे त्यांना निमंत्रण दिले आहे. मार्च महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor