मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (08:20 IST)

शिवसेना आ. तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर?

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. अशावेळी शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्ती केली जातेय. शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज तानाजी सावंत घुटमळत असल्याचे पाहायला मिळाले.
 
तानाजी सावंत हे युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री राहिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे. अशावेळी आज तानाजी सावंत यांची फडणवीसांच्या भेटीसाठी चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं. सावंत यांची भाजपशी वाढती जवळीक पाहायला मिळत आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं. पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली. दरम्यान, स्वत:च्या साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन ही भेट झाल्याचं सावंतांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
 
उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. सावंत यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर यांना चांगलेच धारेवर धरले. या बैठकीत समान निधी वाटप, अखर्चित निधी, प्रशासकीय मान्यता न घेता महावितरण विभागाने केलेली ५ कोटींची कामे, यासह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्यावर आवाज उठवल्याने चांगलीच खडाजंगी झाली. आमदार सावंत यांच्या या पावित्र्याने खासदार आणि पालकमंत्र्यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळालं होतं.