गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (18:13 IST)

शिवसेना वर्धापन दिन : उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार?

शिवसेना पक्षाचा आज (19 जून) वर्धापन दिन आहे. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन वर्धापन दिनाचा सोहळा व्हर्च्युल स्वरूपात होणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना उद्देशून भाषण करतील.
संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होणाऱ्या या सोहळ्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 
गेल्या काही दिवसात शिवसेनेशी संबंधित महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर शिवसेनेवर झालेले आरोप असो वा दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना भवनाबाहेर भाजपच्या आंदोलनामुळे झालेला गोंधळ असो, उद्धव ठाकरे यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य करणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे..
कोरोनाची स्थिती सुधारत गेली आणि निवडणूक आयोगानं ठरवल्यास आठ-नऊ महिन्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक होणं अपेक्षित आहेत. हे लक्षात घेऊन, मुंबईतल्या विविध मुद्द्यांवरून भाजप आधीच आक्रमक झालीय.
 
त्यात दोन-तीन दिवसांपूर्वी शिवसेना भवनाबाहेर झालेल्या आंदोलनामुळे तर सेना-भाजप यांच्यात मुंबईत कसा सामना रंगणार आहे, याचं संकेतच मिळाले आहेत. या मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता वर्तवली जातेय.
तसंच, सिंधुदुर्गातही आज (19 जून) शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पेट्रोल विक्रीच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे एकूणच भाजप विरूद्ध शिवसेना हा सामना रंगत जाताना दिसतोय.
 
दुसरीकडे, गेल्या वर्धापन दिनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिवसैनिकांशी जाहीर संवाद साधला नाहीय. त्यामुळे आजच्या भाषणातून ते काय बोलतात, हे पाहावं लागेल.
आगामी काळात केवळ मुंबईच नव्हे तर नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे काही भाष्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
त्याचसोबत, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सध्यातरी सुरळीत सुरू असलं तरी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप हे सातत्यानं स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. किंबहुना, भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं तर महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेविरोधातम मोर्चाच उघडला आहे. दररोज भाई जगताप शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील कामगिरीवर टीका करताना दिसतात. त्यामुळे या मुद्द्यांसह एकूणच महाविकास आघाडीच्या वाटचालीवर उद्धव ठाकरे काही बोलणार का, हेही पाहवं लागेल.