सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 जून 2021 (07:58 IST)

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीने पावले उचलण्यात यावीत. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
 
मुंबई- नागपूर यांना जोडणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण एक्स्प्रेस वे या प्रकल्पांचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा घेतला. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रकल्पांच्या माहितींचे सादरीकरण केले.
 
नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत. या मार्गाच्या परिसरात पेट्रोलपंप, वाहनचालकांसाठीच्या सुविधा निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री  ठाकरे यांनी यावेळी केल्या. तसेच इतर टप्प्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावे. या कामांचा ऑगस्टमध्ये पुन्हा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण मार्ग आहे. हा महामार्ग चार पदरी  करावा. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल व पर्यटक वाढीसाठीही उपयोग होईल. त्याचप्रमाणे या महामार्गावरील खाडींवरील सर्व पुलांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावेत. भूसंपादनाची कमीत कमी गरज भासेल, अशा प्रकारे कामाचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.