फोटो साभार:सोशल मीडिया
नितेश राऊत
भाजपचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या 19 जूनला मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान स्वगृही परतणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि आज ते काँग्रेसमध्ये पुन्हा आले.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. देशमुख यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती
त्यानंतर 12 जूनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबतच्या एका खासगी बैठकीत देशमुख यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं समोर आलं.
काँग्रेस प्रवेशाविषयी बोलताना सुनील देशमुख म्हणाले, "जेव्हापासून राजकारण कळायला लागलं तेव्हापासून ते 2014 पर्यंत काँग्रेसच्या विचाराधारेवर मी चाललो. 2009 मध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतरही 2014 पर्यंत दुसऱ्या कुठल्याच पक्षात मी प्रवेश केला नाही. उलट स्वगृही परतण्यासाठी मी प्रयत्न केला. पण तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही."
देशमुख पुढे म्हणाले, "2014मध्ये राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विधानसभा लढवली आणि बहुमताने निवडून आलो. पण माझी मूळ विचारधारा काँग्रेसची असल्यामुळे पुन्हा त्याच पक्षात परतण्याचा निर्णय मी घेतला आहे. भाजपमध्ये माझा सन्मान होत होता, त्यामुळे भाजपविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही."
सुनील देशमुख कोण आहेत?
काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून सुनील देशमुख यांना ओळखलं जातं. देशमुख हे श्रीकांत जिचकार, अविनाश पांडे यांच्या फळीतले नेते आहेत.
त्यांनी 1978 मध्ये NSUIचं प्रदेश अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. 1999 मध्ये मातब्बर नेते जगदीश गुप्ता यांचा पराभव करून ते आमदार झाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये कॅबिनेटचा दर्जा असणाऱ्या पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
त्यानंतर 2004 मध्ये ते अर्थराज्य मंत्री राहिले. पण आघाडी सरकारमध्ये अर्थराज्य मंत्री असताना 2009 मध्ये अमरावती विधानसभेचं तिकीट त्यांना नाकारण्यात आलं.
या घटनेविषयी पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय पखोडे सांगतात, "सुनील देशमुख यांनी शेवटच्या रात्रीपर्यंत तिकिटाची वाट पाहिली. पण राष्ट्रपती यांचा शब्द पक्षश्रेष्ठी टाळू शकत नव्हते आणि रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसनं तिकीट दिलं. देशमुखांनी बंड करू नये म्हणून मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. पण त्यांनी ती धुडकावून लावली. ती ऑफर जर त्यांनी स्वीकारली असती तर आज ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असते."
सात वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सुनील देशमुख यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या भाजपप्रवेशाला अनेक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला होता. पण थेट राष्ट्रपतींविरोधात बंड पुकारल्याने नितीन गडकरी यांनी देशमुखांना भाजपमध्ये प्रवेश दिला, असं ज्येष्ठ पत्रकार मोहन आटळकर सांगतात
त्यांच्या मते, "काँग्रेसमध्ये सुनील देशमुख यांची प्रतिमा चांगली होती. 2004 पासून काँग्रेस सत्तेत असताना पालकमंत्री, वित्तनियोजन, जलसंपदा, बांधकाम अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. पण काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे 2009 मध्ये त्यांना काँग्रेस पक्ष सोडावा लागला. देवीसिंह शेखावत यांच्या राजकारणाला बगल दिल्यामुळे त्यांच्या राजकीय पतनाला सुरवात झाली, असं म्हणायला हरकत नाही. वर्चस्वाच्या लढाईमुळे शेखावत गट देशमुखांवर नाराज होता. संधी मिळताच त्यांनी तो सूड उगारला आणि 2009 मध्ये देशमुखांची अमरावती विधानसभेचं तिकीट कापण्यात आलं".
"देवीसिंह शेखावत यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांची निवडणुकीची तयारी नसताना त्यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे देशमुखांना हा अपमान जिव्हारी लागला आणि काँग्रेस मधून बंड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळी राष्ट्रपतींविरोधात उचललेला बंड देशभर गाजलं होतं," अटाळकर पुढे सांगतात.
बंडाच्या तयारीत असताना सुनील देशमुख यांना काँग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषद आणि मंत्रिपदाचीही ऑफर देण्यात आली होती. मात्र आत्मसन्मान दुखावल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली. 2009 ची निवडणूक राष्ट्रपती पुत्र आणि बंडखोर देशमुख यांच्यात लढल्या गेली. पण मुलगे रावसाहेब शेखावत मैदानात असल्यामुळे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे देशमुखांना पराभवाचा सामना करावा लागला.
"काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेसची स्थापना केली. पण सत्तेत राहण्यासाठी पक्षाचा आधार आवश्यक असतो हे लक्षात घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतर 2014 मध्ये जनतेनी त्यांना स्वीकारलं आणि विधानसभेत पाठवलं. पण त्यांच्यातील मूळ काँग्रेस विचारधारा गेली नाही आणि त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा," असं अटाळकर सांगतात.
देशमुखांचा प्रवेश काँग्रेससाठी किती महत्त्वाचा?
सुनील देशमुख यांचा प्रवेश काँग्रेससाठी अनेक अंगांनी महत्त्वाचा असल्याचं राजकीय विश्लेषक संजय पखोडे सांगतात.
पखोडे यांच्या मते, "सुनील देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी अनेक कारणांनी मोठा धक्का आहे. कारण मोठी मुस्लीम वोटबँक त्यांच्या बाजूने आहे. अमरावती विधानसभा मुस्लीम मतांशिवाय जिंकण शक्य नाही हे गेल्या दोन तीन निवडणुकांमधून सिद्ध झालंय.
"दुसरं देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे महानगरपालिकेत पहिल्यांदा बहुमताने भाजपची सत्ता स्थापन झाली. भाजपचे जवळपास 45 नगरसेवक निवडून आले. त्यात सुनील देशमुख गटाचे 17 ते 18 नगर सेवक आहेत. येत्या काळात महानगरपालिकेत उलथापालथची शक्यता नाकारता येत नाही.
"राहिला प्रश्न आमदार सुलभ खोडके यांचा, तर त्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर त्या निवडून आल्या असल्या तरी काँग्रेसला हक्काचा उमेदवार मिळाला म्हणून सुनील देशमुख यांना पुढे करतील. कारण देशमुखांना काँग्रेसमधून तिकिटाचं आश्वासन दिलं म्हणूनच त्यांनी काँग्रेसमध्ये येण्यात निश्चित केलं."