1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (16:56 IST)

ठाण्यात शिवसेनेची शाखा पाडली, उद्धव ठाकरे घटनास्थळाकडे रवाना, पोलीस बंदोबस्त वाढवला

शिवसेनेतील दुफळीनंतर पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी हा संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील मुंब्रा येथील शाखेच्या मुद्द्यावरून सुरू झाला आहे.
 
शिवसेनेच्या मुंब्रामधील मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आला. त्यानंतर ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेत या संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे.
 
शिंदे गटानं पाडलेल्या जागेवर पुन्हा लगेचच भूमीपूजन करून नव्या शाखेच्या पुनर्बांधणी करण्याचं कामही सुरू केलं आहे. पण हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
 
ज्यावेळी या शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आला, त्यावेळी त्याठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते बसले होते, त्यांना खेचून बाहेर काढत पाडावाडी करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी केला.
 
या प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंब्रा इथं भेट देणार आहेत. पाडलेल्या शाखेची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
या परिसरात लावलेले उद्धव ठाकरे यांचे बॅनरही फाडण्यात आले होते. त्यामुळंही वाद निर्माण झाला होता. मुंब्रा येथील या शाखेबाहेर शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्तेही उपस्थित आहेत.
 
याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेद्र आव्हाडही शाखेपासून काही अंतरावर उपस्थित आहेत.
 
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत.
 
शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणे यांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहेस तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर मुंब्रा भागात लावण्यात आले होते, ते देखील फाडण्यात आल्याचं आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.
 
नेमकं काय घडलं?
दोन नोव्हेंबरला ठाकरे गटाचे मुंब्रा शहरप्रमुख विजय कदम आणि काही पदाधिकारी शाखेत बसले होते.
 
त्यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजन किणे हे त्यांच्या समर्थकांसह या शाखेत आले. त्यांनी या शाखेचा ताबा घेतला. त्यानंतर रात्री ही शाखा बुलडोजरने जमीनदोस्तही करण्यात आली.
 
या शाखेसाठी दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ज्या ठिकाणची हा शाखा पाडली तिथे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नवी शाखा उभारणीची तयारी केली.
 
उद्धव ठाकरे आता याबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
 




















Published by- Priya dixit