1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (11:08 IST)

सिकंदर शेख ठरला 'महाराष्ट्र केसरी', खुराकासाठी वडील करायचे हमाली

Sikandar Sheikh
Sikandar Sheikh became Maharashtra Kesari  पैलवान सिकंदर शेखनं 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा जिंकली आहे.
कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात 66 व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 5.37 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले.
 
प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ, तसंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा झाली.
 
अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.
 
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फूट पडल्यानं दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतल्या जात आहेत. दोन्ही गट महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतात. त्यातल्या रामदास तडस यांच्या गटाने भरवलेल्या स्पर्धेत सिकंदर शेख विजेता ठरला.
 
ही स्पर्धा रामदास तडस यांच्या गटाने आयोजित केली होती.
 
पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते.
 
विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.
 
त्यापूर्वी, माती विभागात झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदरने संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चतस्वावर विजय मिळवून किताबी लढतीत प्रवेश केला होता. गादी विभागात शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा तांत्रिक वर्चस्वावर पराभव करून अंतिम फेरी गाठली.
 
सिकंदर शेखचा कुस्ती च्या तालमीत प्रवेश
22 वर्षांचा सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे. लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना चित केल्यामुळे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला.
 
सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात. सिकंदरच्या कुस्तीचा तालीम मोहोळमधूनच सुरु झाल्या. घरी हालाखीची आर्थिक परिस्थिती असुनही त्याच्या आई-वडिलांनी त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहित केलं.
 
सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले.
 
सिकंदर नऊ-दहा वर्षांचा असताना मोहोळमधल्या फाटे तालमीत त्याचा कुस्तीचा सराव सुरु झाला.
 
गेल्या वर्षी सिकंदर शेखनं बीबीसी मराठीला त्याचा प्रवास सांगितला होता.
 
“मोहोळमध्ये चंद्रकांत काळे माझे वस्ताद होते. पहिल्यांदा मी फाटे तालमीत होतो. त्यानंतर सिद्ध नागेश तालमीत गेलो. मला तालमीत पाठवायचं हा माझ्या आई-वडिलांचा निर्णय होता. माझे वडील हे चांगले कसलेले पैलवान होते. त्यांनी हा निर्णय घेतला. पहिलेपासून आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.
 
ते तिशीत आल्यावर त्यांनी पैलवानी सोडली. पण जेव्हा ते पैलवानी करत होते तेव्हा पण हमाली करत होते. खुराक-पाण्यासाठी पैसे नसायचे त्यामुळे पैलवानी करता करता ते हमाली करायचे,” असं सिकंदरने सांगितलं.
 
2018 पासून कोल्हापुरातून पैलवानीला सुरुवात
मोहोळमध्ये सिकंदरचा सराव सुरु होता. पण त्याच्या बरोबरीचे पैलवान तालमीत नव्हते. बाकी मुलं ही लहान होती. त्यामुळे सिकंदरच्या वडिलांनी आणि त्याच्या वस्तादांनी त्याला कोल्हापुरातील गंगावेश तालमीत पाठवायचा निर्णय घेतला. तेव्हा तो अठरा वर्षांचा होता.
 
सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याच्या खऱ्या पैलवानीला गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरुवात झाली.
 
“माझा योग्य डाएट गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरु झाला. विश्वास हरगुळे हे माझे कोच आहेत. इथे आल्यानंतर 2018 साली मी पहिली स्पर्धा जिंकली,” असं सिकंदर म्हणतो.
 
2018 साली सिकंदरने कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक कुस्तीची स्पर्धा जिंकली. यामध्ये त्याने काही नामांकित पैलवानांचा पराभव केला. या स्पर्धेचं बक्षिस म्हणून त्याला एक बुलेट गाडी आणि एक लाख रुपये रक्कम मिळाली.
 
यानंतर आठ दिवसांनी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात कुस्तीच्या स्पर्धा झाल्या. यातही सिकंदर विजयी झाला. यानंतर त्याची राज्यात आणि पंजाब, हरियाणामधल्या कुस्तीच्या स्पर्धांमध्ये घोडदौड सुरु झाली.
 
त्याने 2020 साली महान भारत केसरी ही स्पर्धाही जिंकली . सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याने आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.
 
“2019 च्या सुरुवातीला मी गोल्ड मेडल जिंकलो. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला मेडल मिळाली. आतापर्यंत मी 200-250 स्पर्धांमध्ये तरी खेळलो असेन. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जॉर्जियामध्ये अंडर 23 मध्ये भाग घेतला होता,” सिकंदरने सांगितलं.
 
कुस्तीतल्या विजयांसोबत घरात आर्थिक सुबत्ता
कुस्तीच्या स्पर्धांमधला विजयाच्या मालिकेमुळे सिकंदरच्या घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा बदलली आहे. आता घरात सुबत्ता आली आहे असं सिकंदर सांगतो.
 
“मी तालमीत असताना कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होतीच. ते स्वत:चं पोट मारुन मला खुराक द्यायचे. वडिलांना हमालीतून रोजचे जे शंभर दोनशे रुपये सुटायचे त्यातले पैसे ते मला खुराक साठी द्यायचे. 2017-2018 साली त्यांना खूप चणचण सहन करावी लागली.
 
मला पैलवान करण्याची त्यांचं इतकं भक्कम स्वप्न होतं की ते स्वत:च्या खाण्याकडेही लक्ष देत नव्हते. जमलेले सगळे पैसे खूराकसाठी मला द्यायचे. आता घराची परिस्थिती चांगली झाली आहे. आई वडिलांना आनंद वाटतो. परिस्थिती आता मी चांगली करुन ठेवली आहे."
 
पहिले माझ्या वडिलांकडे सायकल होती. ते सायकल फिरायचे. आता वडिलांकडे इतक्या गाड्या झाल्या आहेत की त्यांना कोणती गाडी वापरु असं होतं. त्यांनी एक गाडी वापरली तर त्या गाडीचा महिनाभर नंबर येत नाही. घर बांधलं. जागा घेतली. शेत घेतलं. पुण्यात फ्लॅटही घेतले. आता वडिलांना हमाली करायची गरज उरली नाही,” सिकंदरने सांगितलं.
 
पंजाब, हरियाणातले कुस्तीचे सामने
सिकंदरने पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांसोबतही सामने खेळले आहेत. त्याभागात कुस्तीचे दोन सिजन त्याने खेळले. हिंदकेसरी पैलवान गौरव मच्छिवाला, पैलवान सतनाम सिंग यांसारख्या नामांकित खेळाडूंसोबत त्याने सामने रंगवले.
 
महाराष्ट्रापेक्षा पंजाब आणि हरियाणात कुस्तीगीरांना जास्त सोयी सुविधा मिळत असल्याचं सिकंदरने सांगतिलं. त्यामुळे तिथले पैलवान महाराष्ट्रातल्या पैलवानांपेक्षा पुढे असल्याचं तो म्हणाला.
 
“मी हरियाणा, पंजाबमध्ये महान भारत केसरी ही स्पर्धा जिंकली. मी दोन सिजन तिकडे खेळलो. तिकडचे पैलवान हे अतिशय कसलेले असतात. तिकडचे २-३ नंबरवरचा पैलवान हा आपल्याकडच्या एक नंबर पैलवानाच्या तोडीचा असतो.
 
हरियाणा पंजाब हे कुस्तीमध्ये महाराष्ट्रापेक्षा खूप पुढे आहेत. आपल्याकडे पैलवानांना सुविधा मिळत नाहीत. प्रॅक्टीस साठी स्टेडीयम, चांगल्या प्रतीच्या मॅट्स उपलब्ध होत नाहीत,” सिकंदरने सांगितलं.