पवारांच्या ऑफरबाबत विचार करू असे म्हटले नाही : शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ऑफरबाबत आपण नंतर सविस्तर बोलणार आहोत, असे म्हटले होते त्याबाबत विचार करू, असे म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकार्यांच्या बैठकीला ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना गाठले व पवार यांनी दिलेल्या ऑफरबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या मुद्द्यावर आता घाईत बोलणे योग्य ठरणार नाही. आपण नंतर सविस्तर बोलू, असे सांगून ठाकरे पुढे निघाले. मात्र, पत्रकारांनी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे यांनी 'सर्वांच्या ऑफर आल्यावर बघू' असे सांगितले व ते तिथून निघाले.
दरम्यान, या विधानाचा अर्थ काढून काही वृत्तवाहिन्यांनी 'शरद पवार यांच्याऑफरचा विचार करू' असे ठाकरे म्हणाल्याचे वृत्त दिले होते. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी पवारांच्या ऑफरबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. ते जे काही बोलले ते केवळ गतीने बोलले आहेत, असे स्पष्टीकरण शिवसेनेच्या प्रसिद्धीप्रुखांकडून आता देण्यात आले आहे.
काय म्हणाले होते पवार?
'देशात दहा ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये नऊ ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. पालघरचे भाजपचे यशही खरे नाही. तिथे शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीच्या तांची बेरीज केल्यास भाजपचा शंभर टक्के पराभव होऊ शकतो हे दिसते', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी शिवसेनेला भाजपविरोधी आघाडीत सामील होण्याचे अप्रत्यक्ष आवाहन पुण्यातील मेळाव्यात केले होते.