बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (08:33 IST)

धक्कादायक ! बैलाचा पिता-पुत्रावर हल्ला; वडिलांचा जागीच मृत्यू तर मुलगा जखमी

सिंधुदुर्गातील  रांगणा-तुळसुली  येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळीव बैलाने मुलगा आणि वडिलांवर हल्ला केल्याची घटना घडली. बैलाने केलेल्या या भयावह हल्ल्यात पित्याचा जागीच मृत्यु  झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी आहे. पाळीव बैलाला पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले असता बैलाने अचानक दोघांवर झडप टाकली. विलास शेट्ये असं मृत्यु झालेल्या वडिलांचे नाव आहे. मुलगा प्रमोद शेट्ये (28) यास गंभीर मार लागला आहे. प्रमोदला कुडाळच्या खासगी रुग्णालयात नेले.
 
याबाबत माहिती अशी, आठवड्याभरापूर्वीच विलास शेट्ये यांच्या मोठ्या भावाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं होतं. आठवड्याभरात एकाच कुटुंबात झालेल्या दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे शेट्ये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेट्ये हे सकाळच्या सुमारास आपल्या बैलाला घेऊन पाणी पिण्यासाठी आणि त्याला आंघोळ घालण्यासाठी नेत होते. यावेळी त्यांचा मुलगा प्रमोद हाही त्यांच्यासोबत उपस्थित होता. यावेळी बैलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बैलाने इतक्या जोरात धडक दिली की, विलास शेट्ये हे जमीनीवर जोरात आपटले.
दरम्यान, या हल्ल्यात विलास यांच्या छातीला, हाताला आणि चेहऱ्यावर गंभीर जखम झाली होती. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बैलाने हल्ला केल्यावर विलास शेट्ये हे खाली पाण्यात कोसळले आणि त्यांच्या आसपास तब्बल 2 तास हा बैल उभा होता. त्यामुळे 2 तास विलास शेट्ये हे चिखलातच पडून होते.