गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (14:01 IST)

कृषी कायद्यांविरोधात 50 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यानी केल्या सह्या

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसकडून विरोध होतोय. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून काँग्रेसतर्फे राज्यात सह्यांची मोहीम राबवली गेली. या मोहिमेत 50 लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करुन या मोहिमेत सहभाग नोंदवला. अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
 
या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी 2 कोटी सह्यांची मोहीम राबवण्याचे निश्चित केले होते. 2 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 
 
“कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान किसान अधिकार दिवस, धरणे आंदोलन, राजभवान येथे जाऊन राज्यपालांना निवेदन तसेच महाव्हर्च्युअल किसान रॅलीच्या माध्यमातूनही भाजप सरकारच्या या अन्यायी कायद्याला विरोध केला. या महामेळाव्यात राज्यातील 10 हजार गावं आणि खेड्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. तसेच सह्यांची मोहीमही राबवण्यात आली,” असं थोरात म्हणाले.