तर मुश्रीफांच्या प्रेमाच्या मिठीने बरगड्या मोडतील - धनंजय मुंडे
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान देऊन पायतानाची भाषा वापरण्यात आली. परंतू ही भाषा करणाऱ्याला मुश्रीफ यांनी प्रेमाने जरी मिठी मारली तर त्यांच्या बरगड्या मोडल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला. तसेच येत्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये जिल्हा बँकेचा विस्तारीकरण समारंभ व शेंडा पार्क येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ होणार असून त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणावे, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या उत्तरदायित्व सभेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री मुंडे म्हणाले, येवला, बीड व कोल्हापुरात ज्या सभा झाल्या त्या आमच्यावर आरोप करण्यासाठीच झाल्या. त्यावर सर्वजण आम्हाला विचारत होते की तुमचे उत्तर काय? तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उत्तर देण्यासाठी नव्हे तर त्यांचे उत्तरदायित्व सांगण्यासाठीच ही सभा घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख ही विकासपुऊष म्हणून होती. परंतु ते आता लोकनेते झाल्याचे जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्यांना आम्ही महत्त्व देत नाही. पण ते आरोप आमचे दैवत असणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोर होत होते. जर कोणी मंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोप करत असेल तर त्याला कोल्हापूरची जनता माफ करणार नाही.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, तपोवन मैदानावरील आजची ही सभा रेकॉर्ड ब्रेक करणारी असून त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. जिह्याच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विचार मांडणारी ही सभा आहे. जे बोलेल ते करणारा, जिवाला जिव देणारा व कार्यकर्त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख आहे. त्यांना ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. यामध्ये थेट पाईपलाईनसाठी 500 कोटी ऊपये, नगरोत्थान योजनेतून 100 कोटींचा निधी दिला. तसेच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी, शिवाजी विद्यापीठ सुवर्ण महोत्सवासाठी, न्याय संकुल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठीही त्यांनी निधी दिला आहे.