शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (17:53 IST)

कोविड सेंटर्ससाठी महिला सुरक्षेसाठी एसओपी लागू करण्यात येणार

कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. विनयभंगाचा प्रयत्न होणं, हे देखील वाईट कृत्य असल्याचं सांगत उपमुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर्ससाठी महिला सुरक्षेच्या अनुषंगाने एसओपी लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली.
 
औरंगाबाद शहरातील पदमपुरा भागात असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टरनेच महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी राऊंडवर असताना डॉक्टरने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेनं आरडाओरड करताच डॉक्टर तेथून फरार झाला. 
 
याबाबत पवार म्हणाले, “औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भगिनीसोबत घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आलं आहे. याप्रकरणी संबंधित आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,” असं अजित पवार म्हणाले.
 
“राज्यातील कोव्हिड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करण्यात येईल. त्याचबरोबर ती लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटर्ससाठी बंधनकारक असेल,” अशी घोषणा पवार यांनी विधानसभेत केली.