मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (13:37 IST)

अनंत गीतेंचं वक्तव्य, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून'

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. "राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच," असं अनंत गीते यांनी म्हटलं आहे.
 
शिवसेनेनी मात्र या वक्तव्यापासून फारकत घेतली आहे. गीते यांच्या वक्तव्याविषयी मला काही माहीत नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत असं संजय राऊत म्हणाले.
 
गीतेंनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
 
"अडगळीत पडलेल्या नेत्यांना भान राहिलेलं नाही. त्याच नैराश्यापोटी आलेलं विधान आहे. एक व्यक्ती बोलल्याने पवार साहेबांचं स्थान कमी होणार नाही", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
 
शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना तटकरे बोलत होते.
 
ते म्हणाले, "महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड होत असताना अनंत गीते आले होते. तेव्हा पवार साहेब होते. त्यांनी वाकून पवार साहेबांच्या पायाला हात लावून आभार मानले होते.
 
"सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. अशी अनंत गितेची अवस्था आहे. ते बोलल्याने फरक पडत नाही. सुर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार आघाडीचे जनक आहेत. उद्धव ठाकरे सक्षमपणे कारभार चालवत आहेत".
 
अनंत गीते नेमकं काय म्हणाले?
"राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच", असं अनंत गीते यांनी म्हटलं आहे.
 
फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत महाविकास आघाडीमधील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येऊ लागले आहेत. श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात गीते यांनी हे उद्गार काढले.
 
"काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही.
 
मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचे गुरू ते होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे," असं गीते म्हणाले.
 
श्रीवर्धन इथं त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
दरम्यान "शरद पवार हे देशाचे नेते आहेत, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल," असं संजय राऊत म्हणाले आहेत. अनंत गीते यांनी शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील व्यवस्था ही तीन पक्षांची एकत्र असलेले व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. ही व्यवस्था 5 वर्ष टिकेल आणि या व्यवस्थेला महाराष्ट्राची मान्यता आहे."