1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जुलै 2022 (21:18 IST)

विद्यार्थिनीस मासिक पाळी प्रकरण : संबंधित विद्यार्थिनी ३८ दिवसांपैकी फक्त ७ दिवस हजर ?

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीस मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपणापासून रोखणार्‍या शिक्षकावर कारवाईसाठी आदिवासी विकास विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी आश्रमशाळेस भेट देऊन शाळा प्रशासनातील मुख्याध्यापक, महिला अधिक्षका, कर्मचारी, संबंधित शिक्षक व पीडित विद्यार्थिनींची चौकशी केली. तसेच सदर प्रकरणाचा तपास सुरू असून या शाळेमधील शिक्षकांचे म्हणणे लिहून घेतले असल्याचे मीना यांनी सांगितले.
 
दरम्यान, यंदा शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू झाल्यापासून संबंधित विद्यार्थिनी ३८ दिवसांपैकी फक्त ७ दिवस हजेरी पत्रकावरून उपस्थित असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणाविषयी संशय असल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वांगाणे विचार होऊनच कारवाई व्हावी, असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे, शाळा प्रशासनाने या वर्षी मुसळधार पावसामुळे वृक्षारोपण केले नाही. मात्र, वर्ग स्तरावर आठ ते दहा वृक्षांची छोटेखाणी लागवडी केली जात होती. परंतु, त्यावेळी ही विद्यार्थिनी गैरहजर असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे एकूणच या प्रकाराविषयी आता अन्य कुणाचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
 
दुसरीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पिडीत विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण करुन घेतले. याशिवाय चमत्कारांचे सादरीकरण करत त्यामागील विज्ञानही स्पष्ट केले. वृक्षारोपणापासून दूर ठेवल्याच्या प्रकाराची दखल घेत अंनिसने शाळेत जाऊन मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मासिक पाळीमुळे ज्या विद्यार्थिनीला वृक्षारोपणापासून दूर ठेवले होते, तिच्या हस्ते कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून घेतले.