रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (09:33 IST)

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय अर्थसंकल्‍पावर प्रतिक्रिया

किसानों के सन्‍मान में मोदी सरकार मैदान में
सन 2019-20 चा केंद्र सरकारच्‍या अंतरिम अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी, सर्वसामान्‍य जनता, महिला आदी सर्वच घटकांना न्‍याय देत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी मोदी सरकारचे लोककल्‍याणकारी धोरण स्‍पष्‍ट केले आहे. शेतक-यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधीच्‍या माध्‍यमातुन 2 हेक्‍टर जमीनधारक शेतक-यांना 6 हजार रू. देण्‍याचा संकल्‍प जाहीर करून किसानों के सन्‍मान में मोदी सरकार मैदान में असल्‍याचे सिध्‍द केल्‍याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.
 
सर्वस्‍पर्शी लोककल्‍याणकारी अर्थसंकल्‍प सादर केल्‍याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांचे अभिनंदन करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे म्‍हटले आहे की, आयकरातील सवलत अडीच लाखाहून पाच लाखापर्यंत वाढवत सर्वसामान्‍य जनतेला मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. संरक्षण मंत्रालयासाठी 3 लाख कोटींचे बजेट जाहीर करत देशाच्‍या सुरक्षेप्रती सरकार सजग असल्‍याचे सिध्‍द केले आहे. किमान वेतनात वाढ करत कामगारांना 7 हजार रूपये बोनस देण्‍याची घोषणा श्रमजीवींच्‍या कल्‍याणाचे सरकारचे धोरण स्‍पष्‍ट करणारी आहे. मत्‍स्‍यपालनासाठी स्‍वतंत्र आयोग, पशुपालनासाठी किसान क्रेडीट कार्ड, गायींसाठी राष्‍ट्रीय कामधेनू योजना या संकल्‍पांच्‍या माध्‍यमातुन कृषीक्षेत्राला मोठा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे. महामार्ग विकासात भारत जगात प्रथम क्रमांकावर असणे तसेच स्‍टार्टअप योजनेत भारत जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वात मोठा हब असणे या नोंदी केवळ अभिमानास्‍पदच नसून भारताची या क्षेत्रातली लक्षणीय प्रगती अधोरेखित करणारी आहे. महिलांना 26 आठवडयांची प्रसुती रजा, अंगणवाडी तसेच आशा वर्कर यांना देण्‍यात येणा-या मदतीच्‍या रकमेत 50 टक्‍के वाढ हे संकल्‍प मातृशक्‍तीचा सन्‍मान करणारे असल्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.
 
पुढील 8 वर्षात भारताला 10 ट्रिलियन डॉलर अर्थव्‍यवस्‍था बनविण्‍याचा केंद्र सरकारचा संकल्‍प देशाला आर्थीक महासत्‍ता बनविण्‍याचे सरकारचे धोरण स्‍पष्‍ट करणारा आहे. एकुणच केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्‍प सर्वच घटकांना न्‍याय देत भारताला जगातील सर्वात प्रगत राज्‍य करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकारची वाटचाल स्‍पष्‍ट करणारा असल्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.