गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 18 जून 2022 (09:20 IST)

प्रियकराचा लग्नाला नकार; कल्याणला राहणाऱ्या 24 वर्षीय मृत तरुणीची आत्महत्या

death
प्रियकराने लग्नाला नकार दिल्यानं एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी कासगाव इथं राहणाऱ्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
 
कल्याणला राहणाऱ्या 24 वर्षीय मृत तरुणीची बदलापूरच्या कासगावमध्ये राहणाऱ्या करण लहाने या तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. यानंतर गेल्या 5 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र तरुणीने त्याच्याकडे लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने टाळाटाळ करत लग्नाला नकार दिला. यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनीही करणच्या घरी जाऊन विनवणी केली. मात्र त्यांनाही करणच्या कुटुंबीयांनी हाकलून दिल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केलाय. या सगळ्यानंतर या तरुणीने करण यांच्याविरोधात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र त्याची पोलिसांनी दखल घेतली नाही. या तक्रारीची करणला माहिती मिळताच करणच्या मित्रांनी या तरुणीला फोन करत करण आत्महत्या करत असून तू लवकर ये, असं सांगितलं. त्यामुळे रविवारी दुपारी ही तरुणी करणला भेटण्यासाठी म्हणून बदलापूरला गेली, मात्र ती घरी परत आलीच नाही.
 
दरम्यान, सोमवारी पहाटे बदलापूरजवळ रेल्वे रुळावर तरुणीचा मृतदेह आढळून आला. यानंतर करणने या तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी करण लहाने याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भोई यांनी दिली आहे. मात्र, कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आहे.