मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (16:37 IST)

करोनाने पालकांचे छत्र हरवलेल्या जेजुरीतील चिमुकल्या मुलींना आधार!

जेजुरी येथील घोणे कुटुंबातील तरुण दाम्पत्याचे करोनामुळे महिन्याच्या कालावधीत निधन झाल्यामुळे त्यांच्या दीड आणि चार वर्षे वयाच्या मुलींचा आधारच हरपला. थकलेले वृद्ध आजी-आजोबांपुढे या मुलींच्या पालनपोषणाची मोठी चिंता निर्माण झाली. याबाबतची माहितीची मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत या मुलींची जबाबदारी स्वीकारली आणि कुटुंबाची चिंता दूर झाली.
 
जेजुरी येथील सूरज विलास घोणे (वय २८) आणि त्याची पत्नी दुर्गा सुरज घोणे यांचे करोनाच्या आजारामुळे एका महिन्यात निधन झाले होते. त्यांना अनघा (वय ४) व आनंदी (वय दीड वर्ष) या दोन मुली आहेत. त्यामुळे या मुलींचा प्रश्न निर्माण झाला. त्यांचे आजीआजोबा वृद्ध आणि थकलेले आहेत. मुलींचे पालनपोषण कसे होणार, याची चिंता त्यांना सतावत होती. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांना मिळाली. त्यांनी जेजुरीतील राष्ट्रवादीचे नेते दिलीप बारभाई यांच्याशी संपर्क साधून संबंधित मुलींचे पालकत्व घेत असल्याचे सांगितले. मुलींच्या घरी जाऊन आजीआजोबांना तसा निरोप देण्याची जबाबदारीही त्यांनी बारभाई यांच्याकडे सोपवली.
 
सुळे यांना निरोप मिळताच बारभाई आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे-पाटील यांनी घोणे कुटुंबीयांच्या घरी जाऊन मुलींचे पालकत्व आम्ही स्वीकारत असल्याचा निरोप दिला. या निरोपाने वृद्ध आजीआजोबांच्या डोळ्यात अश्रू आले. करोनाच्या उपचारातील पुणे आणि जेजुरी येथील रुग्णालयांचे बिल शिल्लक आहे. ते माफ करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असा शब्दही घोणे कुटुंबाला देण्यात आला. मुलींचे शिक्षण आणि पालनपोषण आम्ही करू. आजोबा आणि आजींना योग्य वाटेल त्याप्रमाणे मदत केली जाईल, असे सुळे यांनी कळविले आहे.