गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (18:04 IST)

सुषमा अंधारे : वैजनाथ वाघमारेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं वाद का झालाय?

sushma andhare
“जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रभावीपणे पार पाडत असाल, तर आधी ते तुम्हाला भयभीत करतील, भीती दाखवतील. समजा तुम्ही घाबरला नाहीत, त्यांच्या धाक-दपटशा आणि दमण यंत्रणेला घाबरत नसाल, तर तुमच्या संबंधाने ते तुमचा भवताल संभ्रमित करतील. तुमच्याबद्दल वेगवेगळे भ्रम आणि अफवा पसरवतील. पण समजा हेही अस्त्र निष्प ठरले, तर ते तिसरे अस्त्र काढतील तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील. भय, भ्रम, चरित्र हत्या ही मनुवादी अस्त्र आहेत. यांच्यापासून सावध राहा.”
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं हे विधान नमूद करून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी फेसबुकवर पोस्ट लिहिलीय.
 
सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सुषमा अंधारेंनी केलेल्या या पोस्टला अधिक महत्त्वं आलं.
 
वैजनाथ वाघमारे कोण आहेत, त्यांच्या शिंदे गटातल्या प्रवेशानंतर ते आणि सुषमा अंधारे काय म्हणाल्या, या सगळ्यावरून वादाला तोंड का फुटलं आहे, हे सर्व आपण सविस्तरपणे या बातमीतून जाणून घेऊ.
 
तत्पूर्वी, या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घेऊ.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर काही दिवसांनी गणराज्य संघटनेच्या प्रमुख सुषमा अंधारेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्या शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडत आहेत. दसरा मेळाव्यातील त्यांचं भाषण मोठ्या प्रमाणावर गाजलं.
महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे राज्यभर फिरून शिवसेनेची (उद्धव ठाकरे गट) भूमिका मांडत आहेत.
 
सुषमा अंधारेंच्या आक्रमक भाषणांचा झंझावात सुरू असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटानं वैजनाथ वाघमारे यांना पक्षात घेतलं. वैजनाथ वाघमारे हे सुषमा अंधारेंचे पती होते. आता ते दोघेही विभक्त झाले आहेत.
 
वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातल्या प्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्तरावरून टीकेचा सूर दिसून येतोय की, एखाद्या महिलेच्या राजकीय मुद्द्यांवर टीका करण्याऐवजी तिच्या वैयक्तिक गोष्टींवर भाष्य केले जात आहे.
 
सोशल मीडियावरही अनेकांनी सुषमा अंधारेंना पाठिंबा दर्शवत, या प्रकारावर टीका केलीय.
 
या सगळ्याची सुरुवात वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील (बाळासाहेबांची शिवसेना पक्ष) प्रवेशावरून झाली.
 
वैजनाथ वाघमारे कोण आहेत?
वैजनाथ वाघमारे यांनी काल (13 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात प्रवेश केला.
 
स्वत: वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे या दोघांनीही स्वतंत्ररित्या माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या जवळपास पाच-सहा वर्षांपूर्वी दोघेही वेगळे राहत आहेत.
 
विभक्त होण्याबाबत वैजनाथ वाघमारे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, “मी आणि सुषमा अंधारे 15-20 वर्षे सोबत काम केलं. मात्र, त्या राष्ट्रवादीत गेल्यानं आमच्या खऱ्या नात्याला तडा गेला.”
 
या दोघांना ‘कबिरा’ नावाची मुलगी आहे. कबिरा पाच वर्षांची आहे.
वैजनाथ अंधारे आणि मुलीबाबत माहिती देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “गेली चार-पाच वर्षं मी विभक्त आहेत. आम्हाला पाच वर्षांची लेक आहे. कबिरा सुषमा अंधारे असं तिचं नाव आहे.”
 
मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले वैजनाथ वाघमारे हे राजकीय क्षेत्रात कार्यरत नाहीत. एकनाथ शिंदेंच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात होईल.
 
शिंदे गटातील प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मला राजकीय वारसा नाहीय. सामाजिक कामांचा वारसा आहे. मात्र, यापुढे मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करेन.”
 
नेमका वाद काय झालाय?
सुषमा अंधारेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्या शिवसेनेच्या व्यासपीठांवरून पक्षाची भूमिका मांडत आहेत. दसरा मेळाव्यातील त्यांचं भाषण विशेषकरून गाजलं.
 
पक्षप्रवेशाच्या दिवशी (13 नोव्हेंबर) वैजनाथ वाघमारे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, “येत्या चार दिवसात पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारेंबाबत अधिक बोलेन. पण तिला मी मोठं केलंय.”
 
वैजनाथ वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्यं, अनेकांना पसंतीस पडली नाही आणि राजकीय क्षेत्रात पुढे जाऊ पाहणाऱ्या महिलेचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वाटला. ही भावना सोशल मीडियावरू अनेकांनी व्यक्त केली.
अभ्यासक केशव वाघमारेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, “सर्वच पक्षाच्या 'जात सरंजामी राजकारणात' शोषित समूहातून आलेल्या स्त्रियांच्या गुणवत्तेची चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याची चर्चा कायम केली गेली. त्यांना टोकन म्हणून वापरलं गेलं, भविष्यात वापरलं जाईल.
 
“या जात सरंजामी राजकारणात शोषित जात समूहातून आलेल्या अनेक स्त्रियांना त्यांच्या राजकारणासह व्यक्तिगत जीवनातूनही संपवले गेले आहे, संपवले जाईल. आज शिंदे गटाने अंधारे यांच्याबाबत हे केले आहे. उद्या दुसरा जात सरंजामदारी पक्ष अन्य कोणत्या तरी स्त्रीबाबत करेल. आगदी यापूर्वी केजच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनाही असच संपवल गेलं आहे. कारण जात सरंजामी पितृसत्ताक राजकारणाचे तेच एक व्यवछेदक लक्षण आहे.”
 
वैजनाथ वाघमारेंच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं की, “माझा आणि त्यांचा आता काही संबंध नाही. त्यांनी शिंदे गट निवडला आहे. त्यांना राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा.”
 
तसंच, फेसबुकवर सुषमा अंधारेंनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. विरोधक कशाप्रकारे चारित्र्यावर शिंतोडे उडवू पाहत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न सुषमा अंधारेंनी केलाय.
‘पायाखालची वाळू सरकू लागल्यानं रडीचा डाव’
या संपूर्ण प्रकरणाबाबत बीबीसी मराठीनं ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांच्याशी बातचित केली.
 
त्या म्हणाल्या, “सुषमा अंधारेंचे विभक्त पती हे राजकीय क्षेत्रात कार्यरत नसताना त्यांना पक्षात घेतलं गेलं, यामागचा हेतू मान्य केला तरी त्यातून सुषमा अंधारेंचं मानसिक खच्चीकरण करण्याचा डाव आहे हे भयंकर आहे.”
 
“राजकारणाची पातळी आधीच खालावत चालली आहे. त्यात महिला राजकारणात पुढे जात असताना, तिला अशाप्रकारे अडवण्याचा प्रयत्न चूक आहे. सुषमा अंधारे या त्यांच्या पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसतात. त्यांचं आव्हान पेलवत नसल्यानं शिंदे गटाकडून वैयक्तिक राजकारण केलं जातंय, हे स्पष्ट आहे,” असंही प्रतिमा जोशी म्हणाल्या.
प्राध्यापक नीरज हातेकर यांनीही फेसबुकवरून आपली भूमिका मांडलीय. प्रा. हातेकरांनी लिहिलंय की, “कुणाचे वैयक्तिक आयुष्य कसेही असू देत. आपल्याला काहीही घेणं देणं नाही. पण स्वकर्तृत्वावर एखादी महिला पुढे आली की तिचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणतात. यशस्वी पुरुषाचं सगळं चालून जातं.”
प्रा. हातेकर पुढे लिहितात की, “कुंकू लावल्याशिवाय बोलणार नाहीचा, हा भाग दोन आहे. पुरुषसत्ताक, जातीवर्चस्व हेच आहे. भिडे गुरुजींसारख्यांना हलक्यात घेऊ नका. हे लोक स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक मानतात, एवढी वाईट गोष्ट दुसरी नाही. सुषमा अंधारेंविषयी जो गलिच्छ प्रकारात सुरू आहे त्याचा तीव्र निषेध.”
साहित्यिक प्रज्ञा दया पवार यांनी अंधारेंना पाठिंबा दर्शवत म्हटलंय की, “पायाखालची वाळू सरकायला लागल्यामुळेच हे रडीचे डाव सुरु झालेत महाराष्ट्रात. ऋतुजा, सुप्रिया, सुषमा... माझ्या बहिणींनो, जिगर दाखवण्याची हीच वेळ आहे. हम साथ साथ है!”
 
Published By - Priya Dixit