रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (23:01 IST)

राज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांची दुरध्वनीवरुन चर्चा

रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. त्यावर राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.
 
अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
 
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा घेतला.